ठाणे : भिवंडी येथील फुले नगर परिसरात शनिवारी एका अल्पवयीन मुलीचा  विवाह रोखण्यात आला. मुलीचे वय १४ तर मुलाचे वय सुमारे २१ वर्षे आहे. मुलीच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांना फुले नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून देण्यात आली. बालविकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण विभाग, चाइल्ड लाइन आणि फुले नगर पोलीस यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

 ही चौदा वर्षीय मुलगी तिच्या आई आणि लहान बहिणीसमवेत राहते. मुलीचे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहे. तर मुलाचे कुटुंब भिवंडी येथील कामतघर येथे वास्तव्यास आहे.  जिल्हा बालसंरक्षण विभागाला रविवार, १९ डिसेंबर रोजी भिवंडी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे लक्ष ठेवण्यात आले होते. कोणालाही माहिती पडू नये म्हणून दोन्ही कुटुंबांकडून मुलीच्या घरातच हा विवाह करण्याचे योजिले होते. मुलीचा शुक्रवारी हळदी समारंभही पार पडला , तर रविवारी घरातच लग्नसोहळा पार पडणार होता. मात्र   पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता कारवाई केली.

मुलीच्या पालनपोषणाच्या चिंतेतून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीला वडील नसल्याने तिचे पालनपोषण कसे होणार तसेच मुलीचे वेळेत लग्न होईल का, या सर्व कारणांमुळे मुलीच्या आईनेच मुलीचा बालविवाह ठरविला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनाही मुलीच्या वयाबाबत माहिती असल्याचे समोर आले आहे.