मंगेश पाडगावकरांच्या बालकवितांवर आधारित बालनाटय़ांच्या प्रयोगाला ठाणेकर रसिकांनी दिलखुलास दाद दिली.
डॉ. अरुंधती भालेराव संचालित प्रारंभ कला अकादमीचा ‘बाल नाटय़ोत्सव’ रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. प्रारंभ कला अकादमीच्या लहान दोस्तांनी या बाल नाटय़ोत्सवात आपल्या निरागस अभिनयाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
लहान मुलांना कवी मंगेश पाडगावकरांची ओळख व्हावी यासाठी सात कवितांवर आधारित बालनाटय़ाचे आयोजन प्रारंभतर्फे करण्यात आले होते. घुसगावचे उंदीर, प्रार्थना, परीराणी, छोटे मावळे, धमाल जेवण, बाहुलीचे लग्न, वर्गातला वाघोबा या कवितांवर लहान मुलांनी नृत्यनाटिका सादर केली. ‘व्हॉट्सअ‍ॅपचा तमाशा’ या नाटिकेच्या माध्यमातून भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप यांच्या अतिवापरामुळे हरवत चाललेला संवाद यावर भाष्य केले.
पराग घोगें आणि डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी या नाटकांचे लेखन केले असून डॉ. अरुंधती भालेराव यांनी ही बालनाटय़े दिग्दर्शित केली. कार्यक्रमास उपस्थित असलेले दूरदर्शनचे निर्माते जयू भाटकर यांनी अरुंधती भालेरावांच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत लहान मुलांनी नाटकांना उत्तम प्रतिसाद दिला, असे सांगितले. या नाटिकांमुळे लहान मुलांना पाडगावकर कळले, अशी प्रतिक्रिया प्रा. अशोक चिटणीस यांनी दिली. लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी रंगमंच खूप मोठी भूमिका बजावतो. या व्यासपीठाच्या माध्यमातून लहान मुले खूप शिकतात, असे मत डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी व्यक्त केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले.