ठाणे : राज्यात जमीन घोटाळ्यांच्या चर्चा सुरू असतानाच, मुंबईतील भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यास उत्तर देत भाजप नेत्या, आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत भाषणातून सर्व माहिती सार्वजनिकरित्या मांडली आहे. त्यामुळे हे काही पत्राचाळीसारखं लपवून केलेलं नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी आमदार चित्रा वाघ यांनी सोमवारी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर अत्यंत व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने माहिती दिली आहे.
इमारत बांधताना विकासकाला ज्या परवानग्या आणि कागदपत्रांची आवश्यकता असते, त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच हे काम करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत भाषणातून सर्व माहिती सार्वजनिकरित्या मांडली आहे. त्यामुळे हे काही पत्राचाळीसारखं लपवून केलेलं नाही, असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या नादी त्यांनी लागू नये
या संदर्भातील सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. कोणीही जाऊन तपास करू शकतो. किती पैसे भरले, परवानग्या घेतल्या की नाही, सर्व काही पारदर्शक आहे. जे विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षावर बोट ठेवण्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या मित्रपक्षांकडे लक्ष द्यावे. भाजपवर आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले जे मित्र पक्ष आहेत त्यांची कार्यालय, त्यांची घरे, त्यांची फार्म हाऊस याबद्दलची माहिती घ्यावी. भाजपच्या नादी त्यांनी लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी काय म्हटले होते
राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे.
एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा सुरु असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
