ठाणे : राज्यात वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असून ठाणे जिल्ह्यातील विविध बांधकामे, वाहतुक कोंडी आणि औद्योगिक कामांमुळे वायू प्रदूषणाची स्थिती निर्माण झाल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात समोर आला आहे. उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबई, भिवंडी शहरात इतर शहारांच्या तुलनेत प्रदूषण अधिक आहे. भिवंडीत कारखाने, अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हिवाळ्यातील महिन्यांमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक श्रेणीत जात असल्याचे नमूद आहे. तर नवी मुंबई हे शहरत राज्यातील वेगाने प्रदूषित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. कल्याणमध्ये काही प्रमाणात दिलासादायक स्थिती आहे.

गेल्याकाही वर्षांमध्ये राज्यात वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विविध प्रकल्पांची कामे, बांधकामे, वाहनांतून निघणारा धूर यामुळे वायू प्रदूषणात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. पर्यावरण, हवामान बदल, स्वच्छ हवा या विषयांवर काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशन आणि एन्व्हारोकॅटलिस्ट या संस्थेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारा अहवाल तपासला. सलग आठ वर्षांच्या आकडेवारीवर हा अहवाल आधारित आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, बेलापूर, बदलापूर, भिवंडी, मिरा भाईंदर या शहरांतील हवेची गुणवत्ता तपासली.

ठाण्यात पीएम २.५ ची पातळी सरासरी ३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी ८३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदविली गेली. ठाण्याची हवा मुंबईपेक्षा किंचित सुधारली असली तरी बांधकामांची धूळ, वाहतुक कोंडी, औद्योगिक कामांमुळे शहराला फटका बसत असल्याचे अहवालात म्ह्टले आहे. शहतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) आणि वित्त आयोगाकडून ठाणे शहराला निधी पुरविला असला तरी वापराबाबत अनभिज्ञता असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.कल्याणमध्ये राज्यातील सर्वात कमी पीएम २.५ अर्थात २९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पातळी नोंदविली गेली. परंतु पीएम १० ची पातळी सरासरी ९३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती. हे प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा आणि जागतिक आरोग्य परिषदेच्या मर्यादेपेक्षा १८ पट जास्त आहे. पीएम २.५ चे प्रमाण चांगले असल्याने रस्त्यावरील धूळ नियंत्रित ठेवल्यास हे शहर यशस्वी उदाहरण म्हणून समोर येऊ शकते. मिरा भाईंदरमध्ये पीएम २.५ सरासरी ४१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० चे प्रमाण ९६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदविले.

उल्हासगनरमध्ये पीएम २.५ ची पातळी सरासरी ४७ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी १०१ इतकी नोंदविली गेली. या शहराला एनसीएपी अंतर्गत केवळ २.१ कोटी रुपये निधी मिळाला होता. मर्यादित निधी आणि हिवाळ्यातील प्रदूषणात सतत वाढ होत असल्याने उल्हासनगर हे सर्वात दुर्लक्षित प्रदूषण केंद्रांपैकी एक बनत आहे. तर बदलापूरमध्ये पीएम २.५ ची पातळी सरासरी ४६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी सरासरी १०३ इतकी नोंदविली गेली. डिसेंबर २०२४ मध्ये सांद्रता १९० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पर्यंत वाढली होती. जी राज्यातील सर्वाधिक होती. हिवाळ्यात येथेही वायू प्रदूषणात वाढ होते.

चौकटभिवंडीमध्ये पीएम २.५ ची पातळी सरासरी ४६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी १०५ इतकी होती. भिवंडी हे औद्योगिक केंद्र आहे. येथे मोठ्याप्रमाणात कारखाने, गोदामे असून अवजड वाहनांची वाहतुकही होते. त्यामुळे हिवाळ्यातील बहुतेक महिन्यात हवेची गुणवत्ता धोकादायक श्रेणीत ढकलली जाते. तर नवी मुंबईतील बेलापूरमध्ये पीएम २.५ ची पातळी सरासरी ४३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी १०३ इतकी नोंदविली गेली. अनेक एनसीएपी शहरांपेक्षा जास्त प्रदूषण पातळी असूनही बेलापूर एनसीएपी कार्यक्रमाच्या बाहेर आहे.

नवी मुंबईतील इतर भागात पीएम २.५ ची पातळी सरासरी ३८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी १०२ इतकी नोंदविली गेली. पीएम १० ची पातळी २०१९ ते २०२० पासून जवळपास १०० टक्के अधिक आहे. पावसाळ्यात या शहराला तात्पुरता दिलासा मिळत असला तरी शहरातील जलद बांधकामे, बंदरातील वाहतुक आणि औद्योगिक उत्सर्जनाने हे राज्यातील सर्वात वेगाने प्रदूषित होत असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. या शहरासाठी ९.४५ कोटी रुपयांचा एनसीएपी निधी वाटपापैकी केवळ ५५ टक्के निधीचा वापर झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

धूलिकण (पीएम२.५) हे सर्वात घातक असून शरिरातील फुफ्फुस आणि रक्तप्रवाहात खोलवर जातात. त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यूचा धोका वाढतो. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत अशा नागरिकांना याचा सर्वाधिक परिणाम होतो. पीएम १० मुळे श्वसनाचे विकार, हृदयासंदर्भात आजार होऊ शकतात. हे धुलिकण श्वासावाटे शरिरात प्रवेश करतात.