Navratr utsav 2025 ठाणे : सोमवारी जिल्ह्यात ३ हजार ८६२ देवीच्या मूर्ती आणि ७ हजार ५३२ घटांची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी शनिवारी ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच असलेल्या शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. फूले आणि पूजा साहित्याबरोबरच गरब्यासाठी पारंपारिक कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली होती. या गर्दीमुळे बाजारपेठ परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
ठाणे शहरात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. नवरात्रौत्सवासाठी शहरातील सर्व मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील स्थानक परिसर बाजारपेठ, जांभळी नाका, नौपाडा, राम मारुती रोड या बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात घटस्थापनेसाठी लागणाऱ्या सुगड, माती, देवी मुखवटे, दागिने, नारळ, धान्य असे सर्व साहित्य विक्रीसाठी आले आहे. सध्या रास-गरब्याला एक अनोखे वैविध्य प्राप्त झाले असून अनेकजण उत्साहाने रास-गरब्यात सहभागी होत असतात. त्यामुळे बाजारात रास-गरब्यासाठी विविध प्रकारच्या घागरा, चनियाचोली, जॅकेट, कुर्ता, दुपट्टा सह त्यावर शोभून दिसतील असे ॲाक्साईडचे तसेच घागऱ्यांच्या कापडासह कुंदण, मोती, शिंपले वापरून तयार केलेले दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर छोट्या आकारापासून ते मोठ्या आकाराच्या टोपल्या यावर्षी ३० ते २०० रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहेत.
याशिवाय, नवरात्रीतील देवीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. हे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शनिवारी दुपारपासूनच बाजारात मोठी गर्दी केली होती. यामुळे बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. तसेच जांभळी नाका बाजारपेठेला लागून असलेल्या फुल बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. घटस्थापनेसाठी नऊ दिवस झेंडूच्या फुलांची माळ बनवून ती घटावर सोडण्यात येते. यामुळे या कालावधीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची सायंकाळी बाजारात गर्दी होऊ लागली.
ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या कोर्टनाका येथून बाजारपेठ मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतात. परंतु शनिवारी बाजारात खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे बसगाड्या कोंडीत अडकून पडत आहेत. त्याचा परिणाम, बाजरपेठेला जोडणाऱ्या जांभळीनाका, तलावपाळी, राममारुती रोड, गोखले रोड या अंतर्गत मार्गांना बसत आहे. या मार्गांवर रिक्षांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या रिक्षा कोंडीत अडकून पडल्या होत्या. गर्दीमुळे टिएमटी बसगाड्या सॅटीस पुलावरील थांब्यावर उशीराने पोहचत असून यामुळे थांब्यांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.