ठाणे : ठाण्यात तीन दिवसांपासून कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदविले जात आहे. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाण ४६ टक्के असल्याने उकाडा वाढला आहे. दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. त्यातच दुपारच्या वेळेत होणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, खोदकामे आणि तांत्रिक बिघाड या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत होत असल्याचा दावा महावितरण विभागाकडून करण्यात आला आहे.

ऐन उन्हाळ्याच्या मौसमात अवकाळी पाऊस पडत आहे. या वातावरणातील बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसून येत आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी ठाण्यात ३३ अंश सेल्सिअस तापमान होते. दुसऱ्या दिवशी तापमानात वाढ होऊन ते ३८ अंश सेल्सिअस इतके झाले. शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत ३६.२७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. त्याचबरोबर शुक्रवारी आर्द्रता ४६ टक्के इतकी होती. यामुळे उकाडा वाढला आहे. सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ५ वाजेपर्यंत अंगाची लाहीलाही होत आहे. तापमान वाढीमुळे अनेकजण दुपारच्या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणे टाळत असून यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर वाहनांच्या संख्येत १० ते १५ टक्क्यांनी घट झाली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. यामध्ये दुचाकींचे प्रमाण अधिक आहे. त्यातच ठाण्यात सुरू झालेल्या अघोषित भारनियमानाचा फटका ठाणेकरांना बसत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – ठाणे : उपवन तलावात आणखी एक मृतदेह आढळला

ठाण्यातील, वागळे इस्टेट, पाचपखाडी, तीन हात नाका, नौपाडा या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. दिवसातून अर्धा तास ते पाऊण तासाकरिता वीज पुरवठा खंडीत होत आहे. काही वेळेस दिवसांतून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडीत होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात दुपारच्या वेळेत वीजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हे अघोषित भारनियमनतर नाही ना अशी चर्चाही शहरात सुरू आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील नौपाडा, राम मारुती रोड, हरिनिवास या शहराच्या मध्यवर्ती भागात विजेचा लपंडाव अधिक होत आहे. या भागात अनेक मोठ्या आस्थापना, बाजारपेठ, कंपन्यांची आणि बँकांची कार्यालये आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका येथील कामकाजावर होताना दिसून येत आहे. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी रस्ते नुतनीकरणासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या कामामुळे तसेच तांत्रिक बिघाडाच्या कारणास्तव वीज पुरवठा खंडीत होत असल्याचा दावा महावितरण विभागाकडून करण्यात आला आहे.