‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात प्रशासकीय यंत्रणेचा नागरिकांना शब्द

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील नागरी समस्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी प्रथमच ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या व्यासपीठावरून मीरा-भाईंदरकरांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.  त्यावर अधिकाऱ्यांनी मीरा-भाईंदर शहरात यापुढे बेशिस्तीला थारा दिला जाणार नसल्याची हमी नागरिकांना दिली. अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी या समस्यांनी ग्रासले आहे. शहर झपाटय़ाने वाढत असताना त्यासोबत दिवसांगणिक वाढणारी वाहने, त्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, एक दिशा मार्ग, बेकायदा वाहनतळांचे नियोजन नसणे त्यातच सातत्याने वाढणाऱ्या फेरीवाल्यांसाठी धोरण नसणे याचा परिणाम शहर विकासावर होत आहे. यासाठी  मीरा भाईंदर पालिकेमार्फत यासाठीचे धोरण तयार करून या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय  घेण्यात आला.ज्या फेरीवाल्यांची नोंदणी झाली नाही अशा फेरीवाल्यांनी येत्या १५ दिवसांत याची नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन यावेळी पालिका आयुक्तांनी केले.

‘फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणार’ – बालाजी खतगावकर (पालिका आयुक्त, मीरा-भाईंदर)

मीरा-भाईंदर शहराला अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी या समस्यांनी ग्रासले आहे. शहर झपाटय़ाने वाढत असताना त्यासोबत दिवसांगणिक वाढणारी वाहने, त्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, एक दिशा मार्ग, बेकायदा वाहनतळांचे नियोजन नसणे त्यातच सातत्याने वाढणाऱ्या फेरीवाल्यांसाठी धोरण नसणे याचा परिणाम शहर विकासावर होत आहे. यासाठी  मीरा भाईंदर पालिकेमार्फत यासाठीचे धोरण तयार करून या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय  घेण्यात आला असल्याचे पालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर उत्तर देताना सांगितले.

मीराभाईंदर शहराचे नागरीकरण वेगाने होत आहे आणि त्यासोबत येथील समस्या वाढू लागल्या आहेत. यासाठी शहराचा नियोजित नवा विकास आराखडय़ात आवश्यक त्या बाबी समाविष्ट करणे गरजेचे आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेच्या हातातून काढून ते शासनाच्या ठाणे येथील नगरविकास विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या आराखडय़ात मंडई, वाहनतळे आणि इतर आवश्यक त्या बाबींचा समावेश व्हावा यासाठी महापालिका प्रशासन आपल्या स्तरावर कार्यवाही करत आहे. मात्र शहरातील सुजाण नागरिकांनी देखील यासाठी आग्रह धरून तशी मागणी करणे आवश्यक असल्याचे खतगांवकर यांनी यावेळी सांगितले.

सध्या शहराच्या नियोजनासाठी बदलत्या काळानुसार विविध नियमांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी पालिकेच्या ऑनलाइन पोर्टलवर करण्याचे काम हाती घेतले असून त्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये मीरा-भाईंदरमधील ९ हजार ४१९ फेरीवाल्यांची नोंदणी झालेली आहे. ज्या फेरीवाल्यांची नोंदणी झाली नाही अशा फेरीवाल्यांनी येत्या १५ दिवसांत याची नोंदणी करण्यात यावी, असे आवाहन यावेळी पालिका आयुक्तांनी केले आहे. नोंदणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात एकही अनधिकृत फेरीवाला राहाणार नाही तसेच फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती व नियमानुसारच या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करून रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात येणार असल्याचे आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मीरा-भाईंदर शहरात सुरुवातीला पार्किंग व्यवस्थेची समस्या नव्हती. परंतु काही वर्षांपासून ही समस्या अधिक जटिल होऊ  लागली आहे. यासाठी ज्या ज्या ठिकाणी नव्याने इमारती तयार होतील अशा ठिकाणी सर्व प्रथम पार्किंग व्यवस्था आहे की नाही हे पाहूनच इमारती बांधण्यासाठीची परवानगी देण्यात येईल, तसेच शहरात खासगी व सार्वजनिक अशा वाहनतळांची कोणत्या ठिकाणी उभारणी करता येईल.

कारवाईत कसूर नाही

नागरिकांच्या दररोजच्या येण्या-जाण्याचे रस्ते पूर्णपणे फेरीवाले व बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करून ठेवल्यामुळे आडवले जात आहेत. नागरिकांना याचा त्रास होत असतो याबाबत मागील तीन वर्षांपासून आमच्या संघटनेमार्फत तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप महेंद्र गुजर यांनी केला होता. याला उत्तर देताना वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असल्याचा दावा केला. शहरातील बेकायदा रिक्षांच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यामध्ये मिरारोड, भाईंदर स्टेशन परिसर, नवघर रोड या भागात ७०० बेकायदा रिक्षांवर कारवाई केली आहे तर १०० हून अधिक परवाने जमा केले आहेत. मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या ८० जणांवर कारवाई झाली.

अनिल पवार -वरिष्ठ पोलीस निरीक्षक

 

मान्यवरांची उपस्थिती

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, प्रवक्ता प्रकाश नागणे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी अजित पाटील, हरेश पाटील, मनसेचे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर, स्वाभिमान संघटनेचे मनोज राणे, विकास व संशोधन प्रतिष्ठानचे डॉ. शिवणेकर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे बालकृष्ण तेंडुलकर, सीताराम नाईक, पत्र लेखक अनंत आंगचेकर, फेरीवाला समिती सदस्य राजू काळे, माधवी गायकवाड, मनपा सचिव वासुदेव शिरवळकर, अधिकारी संजय दोंदे, दादासाहेब खेत्रे, जनसंपर्क अधिकारी स्वप्नील सावंत, आयुक्तांचे स्वीय सचिव महेश भोसले, शिवसेनेचे प्रवक्ता शैलेश पांडे, वंचित बहुजन आघाडीचे सुनील भगत तसेच प्रभाकर शेट्टी,  विकास म्हात्रे.

 

‘सजग राहणे गरजेचे’

वाहतूक कोंडीबाबत आणि फेरीवाले रस्त्यावरच बसून रस्ता बंद करीत असल्याबद्दलची तक्रार नागरिकांनी केली होती त्याला उत्तर देताना उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी प्रत्येकाने नागरिक या नात्याने आपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे व कायद्याचे पालन करणे गरजेचे आहेत. जर कायद्याचे पालन झाले नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते यासाठी नागरिकांनी स्वत: सजग राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. फेरीवाल्यांनीही वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणे चुकीचे आहे. त्याने स्वत:च याची जाण ठेवून योग्य त्याठिकाणी व्यवसाय करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

– शांताराम वळवी (उपअधीक्षक)

 

शहरात वाढलेली वस्ती हेसुद्धा वाहतूक कोंडीचे कारण

कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरून जनवादी हॉकर्स सभेचे अ‍ॅड. किशोर सामंत यांनी फेरीवाल्यांचे समर्थन केले. फेरीवाल्यांना अधिकृत आणि बेकायदा ठरविणे चुकीचे असल्याचा आक्षेप घेतला. फेरीवाल्यांनी उपजीविकेसाठी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करणे चुकीचे नाही. यासाठी न्यायालयाने २०१४ साली कायदा पारित केला आहे. त्यानुसार त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजेत. मात्र काही वर्षांपासून शहरात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून  फेरीवाला धोरण ठरवले नसल्याने बेकायदा असल्याचा शिक्का त्यांच्यावर बसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक गोष्टीसाठी फेरीवालेच जबाबदार आहेत, असे नाही तर आजूबाजूच्या परिसरात वाढलेली वस्ती हेसुद्धा वाहतूक कोंडीचे कारण आहे. यासाठी संपूर्ण पालिका प्रशासन जबाबदार आहे, असे ते म्हणाले. या समस्यांमधून शहराची सुटका करायची झाल्यास सर्वात आधी शहराचे नियोजन करणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांसाठी मंडया तयार करण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

-अ‍ॅड. किशोर सामंत( जनवादी हॉकर्स सभा)

 

अल्पवयीन मुलांच्या ताब्यात पालकांनी गाडय़ा देऊ नयेत

मीरा-भाईंदर शहरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ  लागली आहे. याचे कारण म्हणजे शहराच्या वाढत्या शहरीकरणाबरोबरच शहरात गाडय़ांची संख्या वाढली आहे, परंतु त्याचे योग्य रित्या नियोजन नाही तसेच त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे कमी वयोगटांतील मुलांच्या हातात पालकांनी गाडय़ा दिल्या आहेत. त्या गाडय़ा कशाही पद्धतीने चालविल्या जात आहेत. यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. तर दुसरीकडे शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व जे काही शहरात चुकीचे घडत आहे त्यावर नियंत्रण मिळविता येईल, तसेच गाडय़ांसाठी अधिकाधिक वाहनतळ तयार करणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होऊ  लागला आहे. फेरीवाले हे पदपथ तसेच रस्त्यावर मोठय़ा संख्येने बसू लागल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

-विजय पाटील ( नागरिक प्रतिनिधी.)

 

विनापरवाना गाडय़ा हा तर नेम झालाय

मीरा-भाईंदर मध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत. पंरतु त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी अनेक वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे. मात्र त्याकडे प्रशानासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिकेने शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ  नये यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून वाहनतळ उभारले आहे. पंरतु या वाहनतळाचा वापर  केवळ दोन ते चार वाहने उभे करण्यासाठी केला जात आहे. वाहनतळाचा योग्यरितीने उपयोग होण्यासाठी वाहनतळाच्या आसपास मंडई तयार करून त्यात फेरीवाले शिस्तबद्ध पद्धतीने बसविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच शहरात बेशिस्तपणे वाहतूक होऊ  लागली आहे दारू पिऊन गाडी चालविणे, विनापरवाना गाडय़ा चालविणे हे प्रकार सर्रास वाढले आहे. याचा त्रास येथील सर्व सामान्य नागरिकांना होत आहे. यासाठी पालिकेने व वाहतूक पोलिसांनी केवळ आश्वासन न देता  प्रत्यक्ष कृती करून फेरीवाले व वाहतूक कोंडी यावर तोडगा काढावा असे म्हात्रे यांनी सांगितले.

-मीलन म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते.)

 

फेरीवाल्यांसाठी योग्य जागा

मीरा-भाईंदर हे दक्ष आणि जागरूक नागरिकांचे शहर आहे. फेरीवाले हे शहराची गरज आहे यासाठी पालिकेच्या होणाऱ्या महासभेत फेरीवाल्यांना बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून दिली जाणार असून त्याबाबतचे धोरण तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शहराचे नियोजन करण्यासाठी तज्ज्ञांचे पथक बोलावून वाहनतळ व्यवस्था इतर ठिकाणांचे नियोजन कसे करता येईल यावर काम सुरू करण्यात आले आहे. तसेच सध्या सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने शहरातील रस्ते गणेशोत्सवाच्या आधी दुरुस्त करण्यात येतील त्या कामाचीसुद्धा सुरुवात करण्यात आली आहे.

-चंद्रकांत वैती (उपमहापौर.)

 

ना विकास क्षेत्र बदलू नका

शहरातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शहर हे विविध समस्यांच्या विळख्यात सापडू लागले आहे. शहरातील नागरीकरण हे कमी होणार नाही यासाठी शासनाने जे ना विकास क्षेत्र तयार केले आहेत ते बदलण्यात येऊ  नये. याठिकाणी नागरीवस्तीचे क्षेत्र तयार झाले तर लोकसंख्या वाढून शहरातील समस्या अधिक वाढतील. यासाठी सध्या आहे त्याच समस्यावर लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे.

– मुझफ्फर हुसेन (माजी आमदार.)

फेरीवाले दुहेरी संकटात

आझाद हॉकर्स संघटनेचे जय सिंग यांनी ही फेरीवाल्यांची बाजू मांडत शहरांना फेरीवाल्यांची गरज असल्याचे स्पष्ट केले. फेरीवाले हे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाच्या विक्रीचे काम करून दोन पैसे मिळवतात, परंतु त्यांच्यासाठी पालिकेमार्फत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने फेरीवाले दुहेरी संकटात सापडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

-जय सिंग (आझाद हॉकर्स संघटना.)

जनतेचा आवाज

वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना मदतनीस दिले आहेत. परंतु वाहतूक कोंडी होणाऱ्या भाईंदर पूर्व भागात हे मदतनीस दिसत नाहीत. नवघर भागात महापालिकेने तात्पुरते वाहनतळ मंजूर केले आहेत. परंतु ते अद्याप सुरू झालेले नाहीत.

-नीलम ढवण, नगरसेविका

शहरातील शाळा सुटण्याच्या वेळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास जाणवत असतो यासाठी वाहतूक विभागाने शाळा, पालक यांची समन्वय समिती स्थापन करून यावर तोडगा काढावा.  -मर्लिन डीसा, नगरसेविका

बाजार शुल्क वसुली करणारे कंत्राटदार, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून अनधिकृत फेरीवाले वाढत आहेत, बोगस निवासी पत्त्यांच्या आधारे रिक्षांचे परमीट देणारी दलालांची टोळी सक्रिय आहे. त्यामुळे बेकायदा रिक्षा वाढत आहेत.

-संदीप राणे, रिक्षा संघटना

फेरीवाले पदपथ सोडून रस्त्यावर बसत असल्याने एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांना वळण घेताना खूप अडचणी येत असतात. यामुळे एखादा अपघात होण्याची भीती आहे. यासाठी या फेरीवाल्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.  -सुधाकर टाळके

सध्या नागरिक आणि प्रशासन असा समन्वय साधला जात नाही. राजकीय पक्ष आणि प्रशासन असा समन्वय साधला जात असल्याने सर्व सामन्यांच्या समस्या तशाच कायम आहेत. -प्रदीप सामंत

शहरातील विविध आरक्षणे अद्याप ताब्यात घेण्यात आलेली नाहीत. ही आरक्षणे विकसित केली तर मंडई तसेच वाहनतळांची समस्या मार्गी लागेल. -ओमप्रकाश गाडोदिया

मीरा भाईंदरमध्ये खाडी किनारी उभी राहत असलेली बेकायदा बांधकामे यामुळे या भागातील खाडय़ा उथळ झाल्या आहेत.

-अ‍ॅड. हंसराज पाटील

शहरात बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने मोठय़ा प्रमाणात वाहतुकीला व रहदारीला अडथळे निर्माण होत असतात.

-राधाकृष्ण नटराज

रस्ते ये-जा करण्यासाठी मोकळे करण्यात यावे यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार करण्यात आले आहेत; परंतु यावर पोलीस कारवाई करीत नाहीत.  -महेंद्र गुजर

रस्त्याकडेला उभ्या करण्यात येत असलेल्या चारचाकी वाहने हटविण्यात यावी. खासगी सेवा देणाऱ्या बसगाडय़ा अनेकदा फक्त एक दोन प्रवाशांसाठीमोठी वाहने वापरली जातात.  -रमेश जाधव