ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधार्‍यांची प्रायव्हेट आर्मीसारखे काम करीत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे पोलीस आयुक्त सिंग यांना आपला एन्काउंटर करण्याचे आदेश देतील आणि पोलीस आयुक्तही खुर्चीतून उठून आदेश पाळण्याची ग्वाही देतील, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेत निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ११ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणी न्यायालयाने अटक करू नये, असे आदेश दिले असून, १८ जानेवारी रोजी त्यावर पुढील सुनावणी होणार आहे. घटनाबाह्य शिंदे सरकारचा विरोध केल्यास ठाणे पोलीस राजकीय कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असा आरोपही परांजपे यांनी केला. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेले आहोत. त्यामुळे आम्ही अजिबात घाबरत नाही. गोळी घालायची असेल तर छातीत घाला. पाठीवर घालू नका. कारण, मी डोळ्यात डोळे घालून आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. माझी लढाई या घटनाबाह्य सरकारच्या विरोधात अशीच सुरूच राहिल, असेही परांजपे म्हणाले.

हेही वाचा – “बाळासाहेबांच्या सुपूत्राने जेव्हा…”, आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र; म्हणाले, “दोन महिन्यात सरकार कोसळणार”

पन्नास खोके, एकदम ओके, भूखंडाचे श्रीखंड अशा आशयाचे फलक लावल्याप्रकरणी तीन ज्ञात आणि दोन अज्ञात व्यक्तींवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी तिघांना अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी दोन अज्ञातांची नावे स्पष्ट नाहीत. तरीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि पक्षाचे विधानसभाध्यक्ष अभिषेक पुसाळकर हे दोघे घरी नसताना ११ ते १३ जानेवारी दरम्यान सुमारे १० वेळा घरी जाऊन पोलिसांनी त्यांच्या घरातील महिला वर्गाला दमदाटी केली. विशेष म्हणजे, लहान मुलांनाही दमदाटी केली जात आहे. त्यांच्या घरात घुसून बाथरूम, बेडरूम, किचन अगदी बेडही उघडून पाहणी करीत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, शुक्रवारी या दोघांना जामीन झालेला असतानाही पुन्हा पोलिसांनी त्यांच्या घरात प्रवेश करून दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही परांजपे यांनी केला.

तुम्ही जनतेचे सेवक आहात की तुमच्या राजकीय मालकांचे? आयपीएस म्हणून सेवेत येताना घेतलेली शपथ ते विसरले आहेत का? पोलीस हे कायद्याचे रक्षण करण्यासाठी आहेत, असा प्रश्नही परांजपे यांनी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना विचारला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उद्या राज्यकर्ते बदलतील. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आणि कायद्याचे राज्यच चिरंतर राहणार आहे. त्यामुळे, बेकायदेशीर एफआयआर नोंदवून त्रास देण्याचे प्रकार थांबवावेत. अशा कारवायांनी आपण घाबरणार नाही. आपणावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांच्या प्रकरणात आपण लढत आहोत. तुमच्या राजकीय मालकांना खुश करण्यासाठी गुन्हे दाखल कराल. पण, आम्ही घरी बसणार नाही, असेही परांजपे म्हणाले.

हेही वाचा – माळशेज घाटात नवा बोगदा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या रिदा रशीद यांच्यावर हाणामारी आणि ठार मारण्याची धमकी, एट्रोसिटी अ‍ॅक्ट आणि लहान मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याचा अर्थात पिटा आणि पोक्सोसारखा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या हिवाळी अधिवेशनात आणि मंत्रालयात फिरतात. तरीही त्या पोलिसांना दिसत नाहीत आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही. मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल असलेले विकास रेपाळे आणि नम्रता भोसले मुक्तपणे संचार करीत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायला ठाणे पोलीस तयार नाहीत, असा आरोपही परांजपे यांनी केला.