scorecardresearch

टेंभी नाक्याच्या उत्सवाला मुख्यमंत्र्यांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न – शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांचा आरोप

आनंद दिघे यांनी कमिटीमध्ये घेऊन सर्वपक्षीय कमिटी निर्माण केली आणि हा उत्सव साजरा करायचा ठरवले. या उत्सवाला राजकीय स्वरूप द्यायचं नाही, हे तेव्हाच दिघे यांनी ठरवले होते.

टेंभी नाक्याच्या उत्सवाला मुख्यमंत्र्यांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न – शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांचा आरोप
टेंभी नाक्याच्या उत्सवाला मुख्यमंत्र्यांकडून राजकीय रंग देण्याचा प्रकार – शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांचा आरोप

ठाणे : टेंभी नाका येथील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक चंपा सिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांना शिंदे गटामध्ये प्रवेश घेऊन महाराष्ट्र राजकारणात लाज वाटणारे कृत्य केले आहे, असा आरोप शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. आनंद दिघे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सुरू केलेल्या देवीच्या उत्सवाला राजकीय स्वरूप देणं, हे उत्सवाला गालबोट लावण्यासारखा आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच काम हे राज्याची धुरा वाहण्याच आहे. परंतु मुख्यमंत्री ठाकरे घराण्यावरील द्वेषापोटी अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा निवासस्थानी हा प्रवेश घडून आणला असता तर एकवेळ क्षम्य होत. परंतु भर रस्त्यात ते सुद्धा देवीचे आगमन होत असताना केलेले हे कृत्य मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही, असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभले आहेत. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी केलेले कृत्य हे त्यांच्या पदाला शोभा आणणारे नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंभी नाका जय अंबे मातेच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत चंपा सिंग थापा व मोरेश्वर राजे यांनी आम्हाला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याचा प्रवेश घेतला. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचे होते ? सत्तेची मस्ती की स्वतःचा मोठेपणा ? मातोश्रीवर बाळासाहेबांच्या सेवेसाठी अनेक सेवेकरी काम करत होते आणि आहेत. त्यामध्ये सफाई कामगार, जेवण बनवणारे वाढपे, सुरक्षारक्षक असे अनेकांचा समावेश आहे. यांचाही प्रवेश शिंदे गटात करून घेणार की काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

थापा हे बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी सेवक म्हणून काम करत होते. शिवसेना प्रमुख त्यांची अत्यंत काळजी घेत होते. त्यांना वेळोवेळी भरपूर मदत त्यांनी केली होती. शिवसेना प्रमुख स्वर्गवासी झाल्यानंतर थापा यांनी नेपाळला जाण्याचे ठरवले. त्यावेळी सुद्धा त्यांना नेपाळला सन्मानाने पाठविण्यात आले. परंतु हिंदुत्ववादी देश असलेल्या नेपाळमध्ये त्यांचे मन रमले नाही आणि ते मुंबईला पुन्हा परत आले. नोकरी सोडल्यामुळे त्यांना मातोश्री वरती पुन्हा रुजू करून घेतले नसावे. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळे असावे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे ते गेले असावेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र या गोष्टीचे भांडवल करत त्यांचा प्रवेश धार्मिक मिरवणुकीत करून घेतला हे कृत्य योग्य नाही,या असे कारखानीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी भागातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात

नवरात्रोत्सवाचे नेतृत्व करीत असल्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे हे करीत आहेत. परंतु नवरात्राचा उत्सव जेव्हा आनंद दिघे यांनी सुरू केला, तेव्हा नंदू शेडगे, उत्तम सोळंकी आणि परमार हे होते. दिघे यांनी फार छोट्या प्रमाणात उत्सव हा साजरा केला, त्या उत्सवाला आजचा हे स्वरूप आले. दिलीप देरकर हे त्यावेळेला काँग्रेसचे होते. पण त्यांना सुद्धा दिघे यांनी कमिटीमध्ये घेऊन सर्वपक्षीय कमिटी निर्माण केली आणि हा उत्सव साजरा करायचा ठरवले. या उत्सवाला राजकीय स्वरूप द्यायचं नाही, हे तेव्हाच दिघे यांनी ठरवले होते. संपूर्ण ठाणेकरांचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा हा उत्सव आहे आणि या उत्सवाला राजकीय स्वरूप देणं हे उत्सवाला गालबोट लावण्यासारखा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या