घोडबंदर मार्गाला खारेगाव-गायमुख रस्त्याचा पर्याय

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील कायम कोंडीग्रस्त घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख चौपाटी असा खाडीकिनारा मार्ग तयार करण्याचा आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. सुमारे १३ किमीच्या या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहनांचा भार बऱ्याच अंशी कमी होण्याची शक्यता आहे.

किनारा मार्गाचा आराखडा ठाणे महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) पाठवला आहे. त्यामुळे आता या आराखडय़ाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, याकडे लक्ष लागले आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने अवजड वाहतूक सुरु असते. त्याचबरोबर या शहरातून बंदराच्या दिशेनेही अवजड वाहनांची वाहतुक सुरु असते. यापैकी जेएनपीटी बंदर ते गुजरात या मार्गावरील वाहने घोडबंदरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा वापर करतात. या वाहनांची संख्याही मोठी आहे. यामुळे ठाण्यातील माजिवडा नाक्यापासून ते घोडबंदर टोल नाक्यापर्यंत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोंडीचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर खाडीकिनारा मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंत असा हा खाडीकिनारी मार्ग असणार आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये घोषणेपलीकडे काहीच झाले नव्हते. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकल्पाचा आढावा घेऊन त्याच्या प्रकल्प आराखडय़ाचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाचा आराखडा नुकताच तयार केला असून तो आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हा आराखडा पाठविण्यात आला आहे.

मार्ग असा..

’ खारेगाव ते गायमुख चौपाटीपर्यंतचा मार्ग

’ लांबी एकूण १३ किमी.

’ ४० ते ४५ मीटर रुंदीचा आठ पदरी रस्ता

’ १.१३ किमी उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका.

’ ७.२९ किमीचा रस्ता ‘सीआरझेड’मधून जाणार

’ अंदाजे खर्च १२५१ कोटी रुपये.