प्रभागातील विकासकामांच्या उद्घाटनाचा बेत फसला; उद्घाटनाविनाच नालेसफाईची कामे सुरू
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील नगरसेवकांनी प्रभागातील कामांच्या उद्घाटनांचा धडाका लावण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली होती. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नगरसेवकांचे बेत फसल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात आणि या कामांचा शुभारंभ नगरसेवकांच्या हस्ते करण्यात येतो. यंदा आचारसंहिता असल्यामुळे महापालिका प्रशासनाने उद्घाटनाविनाच नालेसफाईची कामे सुरू केल्यामुळे नगरसेवक हिरमुसले आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याच्या सहा महिने आधीपासूनच अनेक नगरसेवक जोमाने कामाला लागतात. प्रभागांमध्ये पाच वर्षांपासून रखडलेली कामे तसेच नव्याने सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी नगरसेवक पाठपुरावा सुरू करतात. कामे लवकर उरकून निवडणुकीपुर्वी उद्घाटनाचे बेत आखले जातात. याशिवाय नवीन प्रकल्पांची आखणी आणि पायाभरणीचे बेत आखण्यात येतात. पावसाळ्यात नाल्यामध्ये पाणी तुंबून आपत्तकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनामार्फत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. ही कामे प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू केली जातात. यानिमित्ताने नगरसेवकांच्या प्रभागामध्ये नाव चर्चेत रहाते. अनेकदा शुभारंभावरून मानापमानाचे नाटय़ही रंगत असल्यामुळे नालेसफाईच्या कामाला उशीर होतो. असे चित्र गेली अनेक वर्षे शहरात पहावयास मिळते. ठाणे महापालिकेची अगामी सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे यंदा नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ नगरसेवकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात होता. तसेच या उद्घाटनाच्या निमित्ताने आगामी निवडणुकीच्या तयारीची योजनाही अनेक नगरसेवकांनी आखण्यास सुरुवात केली होती.
मात्र, विधान परिषदेच्या ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून नालेसफाईची कामे सुरू केली असून ही कामे उद्घाटनाविनाच सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आयती संधीच आचारसंहितेमुळे नगरसेवकांच्या हातून हुकल्याचे चित्र आहे.

नालेसफाई कामांच्या देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक
ठाणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. मुंब्य्रात ३१ किमीचे ९२ नाले आहेत, कळव्यात ९ किमीचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किमीचे ३७, वर्तकनगर १९ किमीचे २५, मानपाडा १७ किमीचे २६, नौपाडा साडेचार किमीचे २४, वागळे ८ किमीचे २०, उथळसर साडेसात किमीचे २४ आणि कोपरीत ४ किमीचे ११ नाले आहेत. या नाल्याच्या सफाईची कामांसाठी ३१ मेपर्यंतची मुदत ठरविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नालेसफाईचे कामे योग्यप्रकारे सुरू आहेत की नाही, याची देखरेख करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तीन नाल्यांसाठी एका वरिष्ठ अधिकारी याप्रमाणे ही नेमणूक असणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.