तीन आठवडय़ांत केवळ ७०८ प्रवाशांचा प्रवास; गर्दीच्या वेळेत सोडल्याने इतर प्रवाशांची डोकेदुखी

किशोर कोकणे

ठाणे : ठाणे-नवी मुंबई दरम्यान प्रवाशांना सोयीचे ठरावे यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर (ठाणे- वाशी-पनवेल) मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकल सेवा पुन्हा सुरू केली. मात्र, या गाडीला अतिशय थंड प्रतिसाद मिळत असून गर्दीच्या वेळेत सोडली जाणारी ही लोकल इतर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. ७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत केवळ ७०८ प्रवाशांनी या लोकलमध्ये प्रवास केला आहे.  

ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्याने जानेवारी २०२०च्या अखेरीस या मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या लोकलच्या १६ फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या उपनगरीय रेल्वेगाडीच्या प्रथम दर्जातील मासिक पासच्या मूळ किमतीपैकी ३० टक्के जास्त रक्कम भरून वातानुकूलित लोकलचा मासिक पास मिळतो. त्यामुळे वातानुकूलित लोकलला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा रेल्वे प्रशासनाला होती. २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात २ हजार ८४६ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर मार्च महिन्यात टाळेबंदी लागू ‘ट्रान्स हार्बर’वर एसी लोकलला थंड प्रतिसाद.

झाल्याने वातानुकूलित लोकल बंद करण्यात आली होती. यंदा ७ ऑक्टोबरपासून वातानुकूलित लोकल पुन्हा सुरू झाली आहे. त्यास अतिशय थंड प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील १६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये केवळ ७०८ प्रवाशांनीच प्रवास केला आहे. याची सरासरी काढल्यास दिवसाला केवळ २९ ते ३० प्रवासी प्रवास करत आहेत. या लोकलची आसनक्षमता ही एक हजारहून अधिक आहे. या लोकलमध्ये प्रवासी संख्या कमी असल्याने त्याचा भार साध्या लोकल गाडय़ांवर आलेला आहे. वातानुकूलित लोकलगाडय़ा रिकाम्या धावत असताना त्यांच्या फेऱ्या सुरू केल्याने वेळापत्रकावरही फरक पडतो. सध्यातरी वातानुकूलित गाडय़ांचा उपयोग नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. करोनाच्या काळात अनेकांच्या वेतनामध्ये कपात झाली आहे, तर काहींचे वेतन गेल्या दोन वर्षांमध्ये वाढले नाही. त्यामुळे आधी वातानुकूलित लोकलकडे वळलेले प्रवासी पुन्हा साध्या उपनगरीय रेल्वेतून प्रवास करू लागले असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

प्रवाशांचा संताप

सकाळी ६.४० ते १०.४० आणि सायंकाळी ५.१६ ते रात्री ९  या वेळेत ठाणे ते वाशी-पनवेल-नेरुळ या मार्गावर एसी लोकलच्या १६ फेऱ्या होतात. करोनाचा प्रादुर्भाव असताना साध्या उपनगरीय गाडय़ांच्या डब्यांमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी असते, तर दुसरीकडे या एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात केवळ दोन ते तीन प्रवासी असतात. एसी लोकलगाडय़ा प्रवाशांच्या डोळय़ांदेखत रिकाम्या धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर होत आहे.

सध्या वातानुकूलित लोकलगाडय़ा ट्रान्सहार्बर मार्गावर सुरू झाल्या आहेत. नागरिकांनीही वातानुकूलित रेल्वे गाडीतून प्रवास करावा असे आवाहन आम्ही करत आहोत.

– पी. डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

वातानुकूलित लोकल हा प्रवाशांसाठी चांगला पर्याय आहे. प्रशासनाने मासिक पासचे दर कमी केल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघ.