शिवसेनेतील बंडखोरीनंतर कल्याण मधील दुर्गाडी येथे शिवसेनापक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थकांनी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी नवरात्रोत्सव साजरा करायचा अशी चढाओढ गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही समर्थकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज दिले होते. ही चढाओढ सुरू असतानाच, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी शिंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांना नवरात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली. शिवसेनेच्या दोन गटात नवरात्रोत्सव साजरा करण्यावरुन चढाओढ सुरू असतानाच वाडेघर ग्रामस्थ मंडळीने गाव पंच कमिटीकडे उत्सव साजरा करण्याची परवानगी देऊन सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या परवानगीने उत्सव साजरा करण्याच्या विषयावर पडदा पडला आहे.

वाडेघरचे ग्रामदैवत

पूर्वपरंपार दुर्गाडी देवीची भौगोलिक हद्द वाडेघर गावाच्या हद्दीत येते. त्यामुळे गावचे ग्रामदैवत म्हणून वाडेघर ग्रामस्थांकडून दुर्गाडी किल्ल्यावर सर्व उत्सव पार पाडले जायाचे. दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव वाडेघर पंच कमिटी साजरा करायची. ५४ वर्षापूर्वी शासनाने हा अधिकार काढून घेऊन तेथे बंदी हुकूम लावला. हिंदूंची देवता असून तेथे बंदी हुकूम कसा लावता असा प्रश्न करत १९६८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा बंदी हुकूम मोडून पत्नी मीनाताई यांच्या सोबत नवरात्रोत्सवाची पूजा केली होती. त्यावेळेपासून दुर्गाडी नवरात्रोत्सव शिवसेनेकडून साजरा करण्यात येऊ लागला. शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख हे या उत्सवाचे अध्यक्ष असायचे.

हेही वाचा : पुन्हा तेच…खड्डे-पाऊस यामुळे ठाण्यात सकाळपासून वाहतुक कोंडीचे विघ्न

बंड़खोरीमुळे वाद

तीन महिन्यापूर्वी राज्यात शिवसेनेत बंडखोरी होऊन ठाकरे, शिंदे समर्थक असे दोन गट तयार झाले. त्याचे परिणाम उत्सवावर दिसू लागले. ठाकरे, शिंदे समर्थकांनी प्रशासनाकडे नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली होती. ही चढाओढ सुरू असतानाच शिंदे समर्थक आ. विश्वनाथ भोईर यांना उत्सव साजरा करण्याची परावनगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. या परवानगीमुळे दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवापूर्वीची रंगरंगोटी, स्वच्छतेची कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व शासकीय नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे आदेश महसुल विभागाचे आहेत.

चुलत बहिणीसोबतच्या अनैतिकसंबंधास विरोध केल्याने आईची हत्या ; भिवंडीतील धक्कादायक प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परवानगी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या विषयी आम्ही कायदेशीर लढाई लढू, असा इशारा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक शिवसेना शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिला आहे. तर आम्हाला परवानगी मिळाल्यामुळे आणि उत्सव साजरा करण्यासाठी कमी कालावधी असल्याने कोणत्याही वादात न पडता किल्ल्यावर सर्व आवश्यक कामे हाती घेण्यात येत आहेत. उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार जाईल, असे आ. भोईर यांनी सांगितले.