प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नालासोपाऱ्यातील तरुणाकडून गतिरोधकांवर काळे-पांढरे पट्टे
नव्या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने अपघात झाला आणि त्या तरुणाला जबर दुखापत झाली. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने गतिरोधकावर पांढरे पट्टे रंगवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. मात्र त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारचा अपघात इतर कुणालाही होऊ नये यासाठी त्याने स्वत: गतिरोधकांवर रंगकाम करण्याचा निर्णय घेतला. एक तरुण हातात रंगाचा डबा व ब्रश घेऊन गतिरोधक रंगवत असल्याचे पाहून लोकांनीही त्याला पाठिंबा दिला.. ही कहाणी आहे कुणाल ठाकूर या तरुणाची.
नालासोपाऱ्यात राहणारा कुणाल हा ३३ वर्षीय तरुण डिझायनरचे काम करतो. दोन आठवडय़ांपूर्वी रात्रीच्या वेळी नालासोपारा पश्चिमेकडून दुचाकीद्वारे तो घरी परतत होता. फन फिएस्टा चित्रपटगृहाजवळ रस्त्यावर एका गतिरोधकावर त्याची गाडी आदळली आणि कुणाल दूरवर फेकला गेला. या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि मणक्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरायला त्याला १५ दिवस लागले. कुणालची गाडी ज्या गतिरोधकावर आदळली, तो गतिरोधक नवीन होता आणि त्यावर नियमानुसार पांढरे पट्टेही नव्हते. त्यामुळे कुणालला रात्रीच्या वेळी गतिरोधक आल्याचे समजले नाही.
अपघातातून सावरल्यानंतर कुणालच्या लक्षात आले, वसईतील अनेक ठिकाणी गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत. अशा प्रकारचा अपघात कुणालाही होऊ नये म्हणून त्याने स्थानिक नगरसेविकेशी संपर्क साधला. पालिका प्रशासनाकडेही त्याने गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा, अशी मागणी केली. मात्र त्याला कुणीही गांभीर्याने घेतले नाही.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कुणाल हताश झाला नाही, तर त्याने स्वत:च गतिरोधकावर पांढरे पट्टे रंगवायला सुरुवात केली. त्याने रंगांचा डबा व ब्रश हाती घेतला आणि वसईतील पांढरे पट्टे नसलेले गतिरोधक रंगवून काढले.
एक तरुण रंगाचा डबा हातात घेऊन गतिरोधक रंगवत आहे हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले, परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे पाऊल उचलल्याचे समजताच त्यांनीही पाठिंबा दिला.
या अपघातात माझा जीव थोडक्यात वाचला. उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च आला. गतिरोधकांवर पांढरे पट्टे असणे ही साधी पण महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र त्याकडेही पालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणा यांचे दुर्लक्ष झालेले आहे. अशा प्रकारचा अपघात इतर कुणालाही होऊ नये यासाठी गतिरोधक रंगवण्याचा निर्णय घेतला.
– कुणाल ठाकूर