कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेत आलेले नवीन आयुक्त थेट भारतीय प्रशासन सेवेतील आहेत. ते साधे भोळे की, कठोर प्रशासकीय करड्या शिस्तीचे आहेत. याचा अंदाज लावण्यास कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचाऱ्यांना सुरूवात केलेली असतानाच, आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिकेतील प्रत्येक विभागाचा बारकाईने कसून चार ते पाच तास आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. आयुक्त गोयल अतिशय कठोर प्रशासकीय शिस्तीचे आणि मुरलेले अधिकारी आहेत याची जाणीव झाल्यापासून, पालिकेत रमतगमत येऊन ढिलेपणा करत प्रशासकीय काम करणारे कर्मचारी, अधिकारी आता कार्यालयीन वेळेच्या अगोदरच येऊन कार्यालयात आपल्या कामाला सुरूवात करत आहेत.

पालिकेतील वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील बहुतांशी कर्मचारी पालिकेत आयुक्त किती कठोर शिस्तीचे आहेत, यावर आपल्या कामाची पध्दत ठरवितात. या कार्यप्रणालीमुळे प्रशासन नेहमीच गतिमानतेत मागे पडले. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत तत्कालीन आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी करड्या शिस्तीने सुरुवातीचे काही महिने कारभार केला. नंतर पालिकेतील ‘कानफुक्या’ विशिष्ट अधिकाऱ्यांच्या कोंडाळ्यात आयुक्त जाखड वावरू लागल्याने त्यांचा प्रशासनावरील वचक कमी झाला. त्याचा गैरफायदा मग बेशिस्त कर्मचाऱ्यांनी उचलला.

नवीन कोणीही आयुक्त आला की त्यांना पहिले आपल्या जाळ्यात ओढण्याची पालिकेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची ख्याती आहे. गेल्या दीड महिन्यात आयुक्त अभिनव गोयल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून ‘श्रवण भक्ती’ने कारभार केला. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असल्याने आयुक्तांनी आता प्रत्येक विभागाचा बारकाईने आढावा घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत आयुक्तांना दृश्यध्वनी चित्रफितीमधून आपल्या विभागाचा कारभार किती उत्तम हेच दाखवून विभाग प्रमुखांनी वेळोवेळी गंडविण्याचा प्रयत्न केला. आयुक्त गोयल यांनी तुमचे विभागाचे सादरीकरण उत्तम आहे, पण प्रत्यक्ष कृतीत ते किती खोटे, बोगस आहे हेच दाखविण्यास सुरूवात केल्याने आतापर्यंत बनचुकेपणाने वागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली आहे.

आयुक्तांनी विभागप्रमुख यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता आयुक्त थेट सामान्य स्तर कर्मचारी, प्रभाग साहाय्यक आयुक्तांशी संपर्कात राहत आहेत. पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कारभार कसा चालतो हे पाहण्यासाठी आयुक्तांनी कार्यालयीन वेळे अगोदर एक रूग्ण नातेवाईकाचा सहकारी म्हणून जाऊन रुग्णालय प्रशासनाची घेतलेली झाडाझडती पाहून वैद्यकीय अधिकारी हबकून गेले आहेत. कामचुकारपणा करणाऱ्या, अशा कर्मचाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या वरिष्ठांना आयुक्त फैलावर घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे पालिकेत सकाळी साडे दहा ते अकरा वाजता येणाऱ्या रमतगमत (लेटलतिफ) कर्मचाऱ्यांची गाळण उडाली आहे. हे कर्मचारी आता कार्यालय सुरू होण्याच्या २० मिनिटे अगोदर येऊन आसनस्थ होत आहेत. पालिकेत मागील सहा महिने सुरू असलेल्या दुपारच्या भोजन वेळेतील ‘स्वयंपाकी गप्पा’ प्रकार बंद पडला आहे.

प्रशासकीय कामात प्रत्येक कर्मचाऱ्याने काटेकोर असले पाहिजे. नागरिकांची, विकासाची कामे वेळेत झालीच पाहिजे. यासाठी आयुक्तांनी कठोर असणे यात गैर काही नाही.- सुरेश तेलवणे, उपाध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर कर्मचारी कामगार सेना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(आयुक्त अभिनव गोयल.)