कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सविता बिराजदार (४३) या महिलेचा मृत्यू रुग्णवाहिके अभावी झाल्याने संतप्त झालेल्या आयुक्तांनी पालिकेच्या वैद्यकीय विभागावर डोळे वटारले आहेत. वर्षानुवर्ष या विभागात सुस्तपणे काम करणाऱ्या डाॅक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना आयुक्त अभिनव गोयल यांनी कामाला लावले आहे. प्रस्तावित केलेल्या कामांच्या विहित वेळेतील पूर्ततेसाठी पालिका वैद्यकीय विभागातील डाॅक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आयुक्तांच्या निर्देशावरून रद्द करण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे मागील अनेक वर्षापासून कोणाचेही लक्ष नव्हते. मनमानी पध्दतीने या विभागात कारभार चालला असल्याने पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर, कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात सामान्य रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळत नव्हत्या. अपघातामध्ये गंभीर झालेले रुग्ण, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना नेहमीच कळवा, मुंबई येथील रुग्णालयांचा रस्ता पालिका डाॅक्टरांकडून दाखविण्यात येत होता. पालिका रुग्णालयातील सेवांबद्दल लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पालिका रुग्ण सेवेबद्दल नागरिक, लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी असतानाच कल्याणमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयात एका अत्यवस्थ महिलेला रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही म्हणून मृत्यू झाला. आयुक्त अभिनव गोयल यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला आहे. या महिलेच्या मृत्युप्रकरणी आपण याप्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पण दाखल करू शकतो, अशी तंबी आयुक्तांनी संबंधित डाॅक्टरांना दिली आहे. पालिका वैद्यकीय विभागात डाॅक्टर, इतर रुग्णालय सेवक कर्मचारी पुरेशा प्रमाणात असताना, तत्पर, दर्जेदार सेवा रुग्णांना का मिळत नाही, असे प्रश्न आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाला केले आहेत.

पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रांमधून रुग्णांंना दर्जेदार रुग्ण सेवा मिळालीच पाहिजे, असा आयुक्तांना आग्रह आहे. यासाठी आयुक्तांनी प्रत्येक डाॅक्टर, कर्मचारी, विभागाला एक उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट विहित वेळेत पूर्ण करण्याचे बंधन घातले आहे. या सगळ्या कामासाठी वैद्यकीय विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आयुक्त गोयल यांना इतर विभागांबरोबर वैद्यकीय आरोग्य सेवेचा बारकाईने अनुभव असल्याची जाणीव झाल्याने पालिकेतील वैद्यकीय विभागातील डाॅक्टर, कर्मचारी आता झटून कामाला लागले आहेत. आपल्या नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डाॅक्टरांना घरचा रस्ता दाखविण्याची तयारी आयुक्तांनी केल्याने धसका घेतलेल्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी समर्पित भावाने आपली नेमून दिलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. पालिका हद्दीत ७५ आरोग्यवर्धिनी दवाखाने सुरू केल्यावर स्थानिक पातळीवर रुग्णसेवा उलब्ध होऊन, पालिका रुग्णालयांवरील ताण कमी होईल, असे आयुक्तांचे मत आहे. हे दवाखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यावर आयुक्तांचा भर आहे.

रुग्णवाहिका, आरोग्य केंद्रे, आरोग्य तपासणी, शवविच्छेदन व्यवस्थापन, औषध साठा, दवाखाने तपासणी याविषयीच्या जबाबदार पालिका मुख्यालयातील डाॅक्टर आणि कर्मचारी सोळा जणांवर सोपविण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षानंतर प्रथमच वैद्यकीय विभागात तत्पर रुग्णसेवा आणि प्रशासन गतिमान झाल्याचे चित्र आता वैद्यकीय विभाग आणि पालिका रुग्णालयांमध्ये दिसत आहे. याविषयावर उघडपणे बोलण्यास मात्र कोणीही तयार नाही.