रेल्वे स्थानकांवर ‘घरवापसी’ची घाई

ठाण्यापासून कल्याणपर्यंतच्या स्थानकांमध्ये बुधवारी सकाळी नेहमीच्या तुलनेत शुकशुकाट होता.

चार वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सदैव गजबजलेल्या ठाणेपलीकडच्या स्थानकांमध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी होती.

नोकरदारांनी सुट्टी घेतल्याने ठाणेपल्याडच्या स्थानकांवर गर्दी कमीच

मुंबईसह आसपासच्या शहरांना २६ जुलै २००५ ची आठवण करून देणाऱ्या पावसाने बुधवारी काहीशी विश्रांती घेतली. मात्र हवामान खात्याने दिलेला इशारा आणि मंगळवारचे हाल डोळय़ांसमोर ठेवून अनेकांनी बुधवारी सकाळी घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे ठाण्यापासून कल्याणपर्यंतच्या स्थानकांमध्ये बुधवारी सकाळी नेहमीच्या तुलनेत शुकशुकाट होता. स्थानकावर असलेली तुरळक गर्दी आदल्या दिवशी मुंबईत अडकून कसेबसे परतलेल्या प्रवाशांची होती. दुसरीकडे, दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातानंतर उत्तरेकडे जाणारी लांब पल्ल्याची वाहतूक जवळपास बंद पडली असल्याने या गाडय़ा थांबणाऱ्या फलाटांवर हैराण प्रवाशांची गर्दी कायम होती.

मंगळवारचा दिवस या सर्वच चाकरमान्यांसाठी हाल-अपेष्टांचा ठरला. मुंबईतल्या संततधार पावसामुळे रेल्वे, रस्ते हे महत्त्वाचे मार्ग बंद पडल्याने अंबरनाथ आणि बदलापुरातील शेकडो चाकरमानी मुंबईत अडकले होते. ठाणे, पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई येथील चाकरमान्यांना वेगळा पर्याय असल्याने ते रात्री उशिरापर्यंत घरी येत होते. मात्र मुख्य मुंबई शहरात नोकरीसाठी असलेल्या बहुतेक चाकरमान्यांना रेल्वे स्थानक, शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये रात्र काढावी लागली. बुधवारी सकाळी रेल्वे लोकल सेवा सुरू झाल्यानंतर बहुतेक चाकरमानी घरी परतले. त्यात मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि माध्यमांमधून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने घरी असलेल्या चाकरमान्यांनी घराबाहरे न पडणेच पसंत केले. मुंबईत अडकलेले चाकरमानी दुपापर्यंत आपापल्या घरी पोहोचले. त्यामुळे सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत सदैव गजबजलेल्या ठाणेपलीकडच्या स्थानकांमध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी होती. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांवर तर शुकशुकाट पाहायला मिळत होता. ठाणे-कर्जत आणि खोपोलीपर्यंत वाहतूक सुरू असल्याने अत्यावश्यक कारणांसाठीच नागरिक घराबाहेर पडून प्रवास करताना दिसत होते.

विसर्जनात अडथळा

चाकरमान्यांचे शहर असलेल्या बदलापूर शहरात अनेक चाकरमानी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. मात्र मुंबई तुंबल्याने घरी न परतू शकलेल्या घरातील कुटुंबप्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे कुटुंबीयांनी उत्तरपूजा करून विसर्जन टाळले किंवा घरीच विसर्जन उरकले, तर अनेकांनी मिरवणूक टाळत बंदिस्त वाहनातून गणेशमूर्ती नेत विसर्जन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Commuters avoid travel due to heavy rain warning by met department

ताज्या बातम्या