कल्याण – भिवंडी कोन ते कल्याण दरम्यानच्या रस्त्यावरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त आहेत. भिवंडी परिसरातील लाॅजिस्टिक पार्कमधील लहान, मोठी माल वाहू वाहने या रस्त्याने सतत धावत असतात. त्यांनाही या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. मुंबई नाशिक महामार्गाने भिवंडी वळण रस्त्यावरून सुसाट वेगाने येणारा प्रवासी कोन भागात आला की तासन तास वाहन कोंडीत अडकत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

भिवंडी शहर, ग्रामीण भागातील बहुतांशी नोकरदार वर्ग मुंबई, नवी मुंबई, आसनगाव, कसारा भागात जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकाचा उपयोग करतात. हे प्रवासी सकाळी भिवंडी शहर परिसरातून सुसाट वेगाने कल्याणच्या रिक्षा, खासगी वाहने, मोटारीने येण्याचा प्रयत्न करतात. ही वाहने त्या वेगाने येतातही, पण कोन गाव हद्द आली की ही वाहने दुतर्फाच्या वाहनांनी कोंडीत अडकतात. कोन गाव परिसरातील ही कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

भिवंडी, कल्याण भागातील अनेक विद्यार्थी परिसरातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. शालेय बस या कोंडीत अडकून पडतात. तासन तास बस कोंडीत अडकून पडत असल्याने लहान मुले बसमध्ये पेंगळतात. मुले वेळेत शाळेत पोहचत नसल्याने शाळा संचालक आणि दुपारी, संध्याकाळी कोंडीमुळे घरी वेळेत परतत नसल्याने पालक त्रस्त आहेत. नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि माल वाहतूकदारांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो.

भिवंडी परिसरात विविध कंपन्यांची गोदामे आहेत. या गोदामांमधील माल लहान टेम्पोमधून दररोज कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील शहरांमध्ये कंपन्याकडून पोहचविला जातो. या वाहनांची या रस्त्यावरील संख्या अधिक आहे. कल्याण, डोंबिवली, शिळफाटा परिसरातील वाहने कल्याण शहरातून शिवाजी चौक मार्गे, गोविंदवाडी वळण रस्ता मार्गे दुर्गाडी किल्ला चौकातून भिवंडीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ही वाहने कोन गाव परिसरातील रस्त्यावर कोंंडीत अडकतात.

आता दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रीच्या भव्य उत्सव सुरू आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते. परिसरातील शेकडो भाविक दररोज दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी येतात. या भाविकांची वाहने दुर्गाडी किल्ला परिसरात वाहनतळ नसल्याने परिसरातील चौक, रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. कल्याण भिवंडी रस्त्यावरील या कोंडीने व्यावसायिक, नोकरदार सर्वधिक हैराण झाला आहे. या कोंडीला कंटाळून भिवंडी ग्रामीण भागातील अनेक नोकरदार वेल्हे परिसरातून खाडीतून डोंबिवली मोठागाव येथे येतात. तेथून रिक्षेने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन प्रवास करत असल्याचे समजते.