ठाणे : सरकारने कामगार संघटनांना विश्वासात न घेता कामगार कायद्यामध्ये बदल करून ४ नवीन लेबर कोड तयार केलेले असून ते कामगार विरोधी आहेत. भांडवलदारांना कामगारांचे शोषण करण्यास मुक्त परवाना देण्यासारखे आहे, असा आरोप कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी कामगार कष्टकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती कल्याण जिल्हा ठाणेच्या वतीने कल्याण येथील कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात १ मे रोजी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार कष्टकऱ्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड कृष्णा भोयर हे होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत नवीन कामगार कायद्याबाबत मत व्यक्त केले. स्वातंत्र्या पूर्वकाळात इंग्रजांनी काही कामगार कायदे केले. स्वातंत्र्यानंतर काही कामगार कायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केले. तर काही कामगार कायदे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियननी वेळोवेळी सरकारशी संघर्ष करून निर्माण केले. हे सर्व कामगार कायदे सत्तेत असलेल्या सरकारने बदलेले आहेत. बदललेले कामगार कायदे लागू करण्याकरीता केंद्र सरकार सध्या धडपड करत आहे. कामगार कायदे बदलल्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्काचे हनन होणार आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने नवीन जनसुरक्षा विधेयक पास करण्याकरीता प्रयत्न सुरू केला आहे. या विधेयकामुळे संविधानाने सरकारच्या धोरणावर बोलण्याचा दिलेला अधिकार संपुष्टात येणार आहे. देशातील आणि राज्यातील सरकारचे धोरणे हे कामगाराच्या विरोधात असून भांडवलदारांच्या बाजूने आहे.सर्व सरकारी संस्था मधील कायम स्वरूपाचा रोजगार संपुष्टात आणून कंत्राटी पद्धतीने कामगार भरती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे. स्थायी स्वरूपाची रिक्त पदे ठेवल्या जात आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी कामगाराची नेमणूक आर्थिक शोषण करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी व्यक्त केला. श्रमिका साठी तयार केलेल्या कामगार कायद्याच्या रक्षणासाठी १० केंद्रीय ट्रेड युनियनने २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये भागीदारी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

कामगार मेळाव्याचे प्रास्ताविक करताना कॉम्रेड उदय चौधरी यांनी जागतिक व भारतीय कामगार चळवळीचा इतिहास सांगितला,कामगार चळवळ टिकवून ठेवण्यसाठी कामगारांनी एकत्रित संघर्ष कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये नवीन जन सुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे. तो कामगार चळवळीतील कार्यकर्त्या करीता कसा मारक आहे, याबाबत त्यांनी विश्लेषण केले. केंद्र सरकारने तयार केलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्याला जबरदस्त विरोध कामगारांनी एकत्रितपणे केला पाहिजे व कामगार चळवळ टिकवली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आज भांडवलशाही प्रबळ होत चाललेली आहे. तिला रोखण्याकरीता कामगार कष्टकऱ्यांच्या हातात सत्ता आली पाहिजे आणि त्याकरिता आपण रस्त्यावर संघर्ष केला पाहिजे असे कामगार एकता कमिटीचे सचिव गिरीश भावे यांनी सांगितले. श्रमिकांनी आपले श्रम वेचून या देशाच्या संपत्तीची निर्मिती केलेली आहे. सध्या सत्तेत असलेल सरकार श्रमिकांनी निर्माण केलेली संपत्ती भांडवलदारांना विकत आहे.

ती विकण्यासाठी भांडवलशाहीला पूरक असे कामगार कायदे तयार करत आहे.त्यामुळे कामगार चळवळ अधिक मजबूत करून भांडवलशाहीच्या विरोधात लढा उभाराला पाहिजे.यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज आहे, असे श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदिश खैरालिया यांनी केले. आपण ज्या उद्योगात काम करतो तो उद्योग टिकवणे,त्याची भरभराटी करणे,ते उद्योग भांडवलदाराच्या ताब्यात जाणार नाही याकरिता सतत संघर्ष करणे याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे.एक मे कामगार दिवस हा कामगाराच्या संघर्षाचा अस्तित्वाचा दिवस आहे.त्यामुळे या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे, असे कॉम्रेड उमेश बोरगावकर यांनी सांगितले. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटित क्षेत्रातील कामगारांनी पुढे आले पाहिजे. त्याचीच आज गरज आहे असे कॉम्रेड ज्ञानेश पाटील यांनी सांगितले.