कमी फेऱ्यांमुळे थांब्यांवर दीर्घ प्रतीक्षा; गर्दीमुळे गाडीत अंतर नियम पायदळी

बदलापूर : करोनाच्या संकटात गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी बंद असलेली रेल्वेसेवा पुढचे काही महिनेही बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखी काही महिने सर्वसामान्य प्रवाशांचा भर सार्वजनिक बससेवेवरच असणार आहे. मात्र, बसच्या फेऱ्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी असल्याने बसथांब्यांवर लांबचलांब रांगा लागत असून प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे, मर्यादित बसगाडय़ांत होणाऱ्या गर्दीमुळे अंतर नियम पायदळी तुडवले जाऊन करोनाचा धोका वाढत आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील विविध शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये बदलापूर आणि अंबरनाथ शहरांतून मोठय़ा संख्येने प्रवास करतात. करोनाच्या संकटात पहिल्या लाटेवेळीच रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी बेस्ट, राज्य परिवहन, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या परिवहन सेवांनी मोलाची कामगिरी केली. मात्र अत्यावश्यक सेवेसह इतर महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवास सुरू झाल्याने मोठय़ा संख्येने या शहरांना मिळणारी बससेवा कमी करण्यात आली. सध्याच्या घडीला बदलापूर शहरातून राज्य परिवहन, एनएमएमटी आणि केडीएमटी या परिवहन सेवांच्या बस चालवल्या जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचीही संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो आहे. पेट्रोलच्या दराने गेल्या काही दिवसांत शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे एरवी खासगी चारचाकी, दुचाकीने नवी मुंबई, ठाणे गाठणाऱ्यांनी आपला मोर्चा बससेवेकडे वळवला आहे. मात्र बसची संख्या अपुरी असल्याने बसमध्ये प्रवाशांची गर्दी होते आहे. त्यात अंतरनियमांचे पालन अशक्य बनले आहे. बससेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता बससंख्या वाढवण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

बदलापूरहून नवी मुंबईला प्रवासासाठी सध्या ८ फेऱ्या आहेत. मात्र सकाळच्या वेळी ७ वाजून ५० मिनिटांनंतर थेट ९ वाजून १५ मिनिटांनी दुसरी बस आहे. त्यामुळे प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी एकतर लवकर किंवा उशिराची बस पकडावी लागते. काही बस मध्यंतरीच्या काळात बंद करण्यात आल्या आहेत. उत्पन्न आणि प्रवाशांची गर्दी असलेले मार्ग अचानक बंद का केले जात आहेत असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करत आहेत. बदलापूर बस स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. स्थानकातून फक्त पनवेल, मुरबाड आणि लांब पल्लय़ाची चोपडा हीच फेरी सुरू आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कारभारावर प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

पूर्वी बदलापुरातून नवी मुंबईसाठी पाच बस सोडल्या जात होत्या. आता ही संख्या तीनवर आली आहे. वातानुकूलित बसही बंद करण्यात आली आहे. बस वाढवण्याची गरज असताना बंद केली जात असल्याने प्रवास करायचा कसा, खासगी वाहने ?????परवडणारी झाली???????? आहेत. – परेश केणी, प्रवासी, बदलापूर.

मध्यंतरीच्या काळात प्रवासी संख्या कमी झाल्याने काही फेऱ्या बंद केल्या होत्या. मात्र प्रवाशांनी मागणी केल्यास पुन्हा मुंबई, ठाणे या फेऱ्या सुरू केल्या जातील.

– मानसी शेळके, बसआगार प्रमुख, विठ्ठलवाडी.