भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्मादाय उपायुक्तांची विश्वस्तांना नोटीस; स्थावर मिळकतीचे व्यवस्थापन न केल्याचा ठपका

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथील श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानच्या विश्वस्तांना ठाणे धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मंदिर संस्थानच्या स्थावर मिळकतीचे योग्य व्यवस्थापन ठेवले न गेल्याचा ठपका धर्मादाय निरीक्षकांनी चौकशी अहवालात ठेवला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कलमांचे संस्थानाकडून उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

संस्थानच्या एक विश्वस्त अनिता गोसावी यांनी जानेवारी महिन्यात धर्मादाय उपायुक्तांकडे न्यासाच्या कार्यपद्धतीविषयी दोन स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. उपायुक्तांच्या आदेशावरून निरीक्षक अ. त्रिं. उंबरे यांनी २८ जानेवारी रोजी स्थळभेट दिली.  त्या वेळी तक्रारदाराने दिलेली माहिती तसेच संस्थानाच्या उपलब्ध अभिलेखांतून संस्थानाच्या कारभाराबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. न्यासाच्या मुदत ठेवींमध्ये अपहार झाल्याचीही तक्रार आहे. न्यासाचे विश्वस्त मनोज प्रधान यांनी तीन कोटी २२ लाख ८५ हजार ६५८ रुपयांच्या मुदत ठेवी आणि त्यावरील व्याजाच्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार आल्यानंतर या प्रकरणी गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे, असे चौकशी अधिकाऱ्यांनी निरीक्षण अहवालात म्हटले आहे. मंदिर संस्थानकडे मोठय़ा प्रमाणात मिळकती आहेत. या मिळकतींची माहिती नोंदणीकरण वहीत तपशीलवार ठेवण्यात यावी, अशा सूचना वारंवार देऊनही त्याचे पालन संस्थांकडून केले गेले नाही, असा ठपका अहवालात ठेवला आहे. संस्थानकडे किती जमिनी आहेत त्याची तपशीलवार माहिती विश्वस्त, कर्मचाऱ्यांना देता आली नाही. अनेक मिळकतींवर अतिक्रमणे झाली आहेत, असा ठपका अहवालात ठेवला आहे.

बोरिवली तालुक्यातील दहिसर आणि वसई तालुक्यातील भिनार येथील जमीन विक्रीतील पूर्ण रक्कमही न्यासाच्या खात्यात जमा झाली नसल्याचे कागदपत्रांवरून आढळले आहे. या प्रकरणी न्यासाचे विश्वस्त मनोज प्रधान, कल्पेश पाटील आणि अविनाश राऊत यांना नोटीस बजावण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.  दरम्यान, यासंदर्भात संस्थानचे विश्वस्त आणि तक्रारदाराची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

आमच्या कार्यालयातून वेगळ्या प्रकारच्या नोटिसा न्यास संस्थांना पाठविण्यात येतात. कोणत्या प्रकारच्या नोटिसा तिकडे पाठविल्या आहेत हे तपासून सांगावे लागेल. नोटिसांच्या प्रकारामुळे कागदपत्र पाहून वज्रेश्वरी देवस्थान प्रकरणाविषयी बोलता येईल.

अ. त्रिं. उंबरे, निरीक्षक धर्मादाय कार्यालय, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in the administration of vajreshwari temple institute
First published on: 17-05-2019 at 00:15 IST