Shardiy Navratri 2025, ठाणे : टेंभीनाका येथील देवीची आगमन मिरवणूक कळवा येथून आज दुपारी निघाली. या मिरवणूकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले आहेत. मिरवणूकीत मोठ्याप्रमाणात गर्दी झाली असून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात कळवा नाका, विटावा, कोर्टनाका आणि ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनखाली १९७८ साली नवारात्रौत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. यंदा या उत्सवाचे ४८वे वर्ष आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्रौत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला नवारात्रौत्सव ठाणे शहरातील मानाचा उत्सव मानला जातो.

दिघे यांची दुर्गेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी असल्याचे म्हटले जाते. यासाठी या देवीच्या दर्शनाकरिता केवळ ठाणे शहरातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त येत असतात. या देवीची आगमन मिरवणूक देखील मोठ्या जल्लोषात निघते. आज, दुपारी उशिरा कळवा येथून देवीची आगमन मिरवणूक निघाली आहे. या मिरवणूकीत लेझीम पथक,ढोलताशा पथक तसेच वारकरी बांधव देखी टाळ वाजवत या मिरवणूकीत सहभागी झाले आहेत.

परंतू, या मिरवणूकीदरम्यान कळवा नाका, विटावा, कोर्टनाका आणि ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे बेलापूर मार्गावर कोर्टनाका ते विटावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईहून ठाणे, कळवा भागात वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. कळवा नाका येथे मिरवणूक काही वेळासाठी थांबवून नाट्य सादर करण्यात आले. यामुळे या परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. याचा फटका कळवा भागातील अंतर्गत मार्गांवर देखील पडल्याचे दिसून आले.