डोंबिवली- येथील औद्योगिक विभागातील विको नाक्याला चहुबाजुने हातगाड्यांचा विळखा असतो. या हातगाडयांमुळे विविध प्रांतामधून कंपन्यांच्यामध्ये कच्चा, पक्का माल घेऊन आलेले मालवाहू ट्रक जाण्यासाठी प्रशस्त रस्ता नसल्याने वाहने अडकून पडतात. त्यामुळे या नाक्यावर अलीकडे दररोज कोंडी होत आहे.
हेही वाचा >>> भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू
शिळफाटा रस्त्यालगत नंदी पॅलेस हॉटेलच्या बाजुला विको नाका आहे. या नाक्यावर कंपनी कामगार, टेम्पो चालक यांची अधिक संख्येने रेलचेल असते. या भागातील रस्ता ६० फुटी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा कंपन्यांमध्ये माल घेऊन येणारी वाहने उभी असतात. विको नाक्यावरील वर्दळ वाढल्याने याठिकाणी मागील काही महिन्यांपासून चौकाच्या मध्यभागी, आजुबाजुने खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्या लावल्या जात आहेत. स्थानिक मंडळीच्या आशीर्वादाने हे व्यवसाय या भागात सुरू आहेत.
अवजड मालवाहू वाहने या चौकातून जात असताना, वळण घेताना चालकांना या हातगाड्यांचा अडथळा येतो. वाहन चालकाने हातगाडी चालकाला हातगाडी, चहाचा ठेला बाजुला घेण्यास सांगितले, तर विक्रेता चालकाला उलटसुलट उत्तरे देऊन जागेवरचा हटत नाही. काही चालकांना विक्रेते दमदाटी करतात, अशा तक्रारी आहेत.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
पालिका प्रशासन, एमआयडीसीने या चौकातील कोंडी दूर करण्यासाठी या भागातील हातगाड्या, ठेले काढून टाकण्यासठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उद्योजकांना केली जात आहे. काही उद्योजकांनी या व्यवसायिकांना विको नाका चौकात व्यवसाय करू नका म्हणून सूचना केली होती. त्यांना विक्रेत्यांनी आम्हाला तुम्ही दुसरी पर्यायी जागा द्या, अशी मागणी केली असल्याचे समजते. पालिका, एमआयडीसी प्रशासनाने डोंबिवली एमआयडीसीतील महत्वाचे, वर्दळीचे रस्ते, चौक मोकळे ठेवण्यासाठी या चौकांमधील हातगाडी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक, उद्योजकांकडून केली जात आहे.