जागावाटप, पालिकेतील महत्त्वाच्या पदांवरून काँग्रेस आक्रमक

ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी करण्याच्या निर्णयावर दोन दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब केले असले तरी घोडबंदर, बाळकुम, वागळे आणि मुंब्य्रातील आठ जागांच्या वाटपावरून दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गेल्या पाच वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन या निवडणुकीनंतर महापालिकेतील पदवाटपांचे सूत्र कसे असेल आणि काँग्रेसच्या पदरात काय पडेल, याचे ठोस आश्वासन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आघाडी करायची नाही, असा सूर काँग्रेसच्या स्थानिक नेते लावत आहेत.

मुंबई महापालिकेत दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार नसली तरी ठाण्यात मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु, स्थानिक पातळीवर आघाडीबाबत अद्याप मतभेद आहेत. घोडबंदर, वागळे, बाळकुम आणि वागळे परिसरातील आठ जागांवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी दावा केला असून याच जागांवरून आघाडीचे घोडे अडले आहे. काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. त्याच वेळी या जागांचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. मात्र, तरीही सत्ता काबीज करण्यात या दोन्ही पक्षांना यश आले नाही. आघाडी करतेवेळेस, पालिकेतील विविध पदांचे वाटप कसे असेल, याचे सूत्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार, काँग्रेसला एका वर्षांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, असे ठरले होते. परंतु, गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने या कराराला बगल दिली. त्यामुळे यंदा निवडणुकीतील जागावाटपासह महापालिकेतील पद वाटपांचे सूत्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मान्य होत नाही, तोपर्यंत आघाडी करायची नाही, असा सूर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लावला आहे. ‘या निवडणुकीनंतर महापालिकेतील पद वाटपांचे सूत्र कसे असेल आणि काँग्रेसच्या पदरात काय पडेल, याचा करार दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपुढेच ठेवला जाईल,’ असे मनोज शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनीच आघाडीचा निर्णय जाहीर केला आहे. स्थानिक नेत्यांचा राणे यांच्यावर विश्वास नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे. तसेच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची भूमिका काही असो, आम्ही मात्र आघाडी धर्म पाळू, असे आव्हाड म्हणाले.