डोंबिवली – येथील मोठागाव ते हेदुटणे या साडेसात किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ता (रिंगरुट) मार्गातील महत्वाचा भाग असलेल्या आयरे गाव हद्दीत वळण रस्त्याला बाधा येईल अशा पद्धतीने बांधकामधारकांनी सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. रात्रंदिवस हे काम सुरू असताना पालिकेच्या ग प्रभागातील बीट मुकादम, नियंत्रक अभियंत्यांना हे काम दिसत नाही का, असे प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून केले जात आहेत.

टिटवाळाकडून येणाऱ्या ३० किमी वळण रस्त्यामधील टिटवाळा ते दुर्गाडीपर्यंतच्या टप्प्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. आता दुर्गाडी ते मोठागाव-माणकोली वळण रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. या टप्प्यानंतर आयरे, भोपर, काटई, शीळ ते हेदुटणे या साडेसात किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम ‘एमएमआरडीए’कडून हाती घेतले जाणार आहे. वळण रस्त्यासाठी पालिकेकडून भूसंपादन केले जाते. ते प्राधिकरणाच्या ताब्यात कागदोपत्री स्वाधीन केले की मग प्रत्यक्ष रस्ते कामाला एमएमआरडीएकडून सुरूवात होते. आयरे भागात वळण रस्त्याचा एक ते दीड किमीचा भाग आहे. या रस्ते मार्गात यापूर्वीच बेकायदा चाळी झाल्या आहेत. रहिवास असलेल्या या चाळी तोडण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या ग प्रभाग अधिकाऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत आयरे गावातील स्मशानभूमी जवळील वळण रस्ते मार्गात भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत बांधण्यास सुरूवात केल्याने रस्ते मार्गाला आणखी एक नवीन अडथळा उभा राहिला आहे.

हेही वाचा – ठाणे : सुरक्षारक्षकाला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

वळण रस्त्यात बेकायदा इमारत बांधून त्यात तातडीने रहिवास सुरू करायचा. भूसंपादन करण्यासाठी पालिका अधिकारी आले की त्यांना इमारत जागेचे बनावट कागदपत्र दाखवून, पालिकेकडून भरपाई वसूल करण्याचा प्रयत्न करायचा. अशीच पद्धत मागील अनेक वर्षांपासून पालिकेत रुढ झाली आहे. त्या पद्धतीचा अवलंब आयरे गावात भूमाफियांनी सुरू केला आहे. वळण रस्त्यात निर्माणाधीन असलेल्या या बेकायदा इमारतींवर ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

हेही वाचा – कल्याणमध्ये विसर्जनस्थळी तरुणीला बेदम मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन वर्षांच्या काळात आयरे गाव हद्दीत १६ टोलेजंग बेकायदा इमारत माफियांनी उभारल्या. आता २५ हून अधिक बेकायदा बांधकाम आयरे परिसरात सुरू असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. ग प्रभागातील बीट मुकादम, त्यांच्या नियंत्रकांना या बेकायदा इमारती दिसत नाही का, असे रहिवाशांचे प्रश्न आहेत. आयरे परिसराचा बहुतांशी भाग सीआरझेड, गावठाण क्षेत्राचा आहे. त्यामुळे या भागात नवीन एकाही बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही, असे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.