डोंबिवली- डोंबिवलीतील मोकळ्या जागा, पालिकेचे आरक्षित भूखंड, सरकारी जमिनी बेकायदा इमारती, चाळी बांधून हडप केल्याने शहरात आता बांधकामासाठी जागा शिल्लक नाहीत. भूमाफियांनी आता शहरालगतचे तलाव बुजवून बेकायदा चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव हद्दीतील ब्रिटिश काळापासूनचा तलाव भूमाफियांनी भराव टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे. याप्रकाराने पर्यावरण प्रेमी, स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारण्याचा कल्याण, डोंबिवलीत सपाटा उठविला आहे. तोडलेली बेकायदा बांधकामे, पालिका अधिकाऱ्यांनी ‘एमआरटीपी’चा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेली बेकायदा बांधकामे पुन्हा नव्याने उभारण्यास सुरुवात केली आहे. २७ गाव, डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालिका, महसूल, पोलीस अधिकारी या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा >>> “मर्द-मर्द म्हणणाऱ्यांनी मर्दासारखं वागावं”, ठाण्यात बॅनरद्वारे शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला

या दुर्लक्षितपणा मधूनच डोंबिवली पूर्व आयरे गाव भागातील ब्रिटिशकालीन पुरातन तलाव भूमाफियांनी माती, सिमेंट तुकड्यांचे भराव टाकून बुजविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या तलाव परिसरात सुमारे ५० हून अधिक बेकायदा चाळी माफियांनी उभारल्या आहेत. ही बांधकामे आताच रोखली नाहीत तर येत्या काही महिन्यात तलाव नामशेष होईल, अशी भीती या भागातील रहिवासी उत्तम जाधव यांनी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

विरंगुळा नष्ट

बेकायदा बांधकामे करताना भूमाफिया दहशत, शस्त्रसज्ज असल्याने जीवाला धोका होण्याची भीती असल्याने स्थानिक रहिवासी याविषयावर उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. काही पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन ही बांधकामे रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही माफियांनी तेथून पिटाळून लावल्याचे समजते. गर्द झाडीत दीड एकर (६०गुंठे) परिसरात आयरे तलाव पसरला आहे. एक एकर जागेवर सुमारे १२० चाळींची उभारणी होऊ शकते, अशी माहिती तक्रारदार जाधव यांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे : तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत, नागरिकांनी पायी चालत ठाणे रेल्वेस्थानक गाठले

आयरेगाव परिसरातील रहिवाशांना मोकळ्या वातावरणात फिरण्यासाठी, विरंगुळा म्हणून बसण्यासाठी आयरे तलाव हे एकमेव ठिकाण होते. तेच आता भूमाफियांनी हडप करण्यास सुरुवात केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागातील अनेक रहिवासी गणपती, नवरात्रोत्सवात देवीचे विसर्जन आयरे तलावात करतात. आयरे गावातील जुन्या तलावाचे अस्तित्व नष्ट होत असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बालाजी गार्डन भागात माजी नगरसेवक रवी पाटील यांनी तलावाची उभारणी केली आहे.

आयरे गाव भागात भूमाफियांनी १४ बेकायदा इमारती उभारल्या आहेत. त्यांच्यावरही पालिकेकडून कारवाई होत नसल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. पोलीस बंदोबस्त मिळाला की ही बांधकामे जमीनदोस्त करू, असे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आयरे गाव तलावाची प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना देतो. अशाप्रकारे नैसर्गिक स्त्रोत बुजविण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.” जयराज देशमुखतहसीलदार, कल्याण.