ठाणे : ठाणे शहरात गेले काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु होती. परंतू, गुरुवारी रात्री पासून पावसाने जोर धरला होता. आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे सकाळी नोकरीसाठी निघालेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत ४१.६४ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतू, पावसाची संततधार असल्यामुळे कोणत्याही सखल भागात पाणी साचले नव्हते.
सध्या गणेशोत्सवाचा कालावधी सुरु असून उद्या गणपतींचे विसर्जन आहे. त्यासाठी आता सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरु आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसापासून इतक्या प्रमाणात पाऊस पडत नव्हता. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते. तसेच गणपती विसर्जन मिरवणूकीची जय्यत तयारी करण्यात ते मग्न होते. परंतू, रिपरिप सुरु असलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून काहीसा जोर धरल्याचे पाहायला मिळत. आहे. शुक्रवार, आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे उद्या, विसर्जनाच्या दिवशी देखील असाच पाऊस राहिला तर, मिरवणूक कशी काढायची असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर निर्माण झाला आहे.
आज सकाळपासून संततधार पाऊस जरी असला तरी, मध्येच पावसाचा जोर वाढत आहे. ईद निमित्त शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर, टीएमटी बसगाड्यांमध्ये नागरिकांची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे पाऊस जरी असला तरी सुट्टी असल्याने बरेच नागरिक हे घरातच आहेत. परंतू, काही खासगी कंपन्या आज सुरु आहेत.
खासगी कंपन्यांमध्ये काम करणारा नोकरदार वर्ग सकाळी कामाला जाण्यास निघाला तेव्हा या पावसामुळे त्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. तर, भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे गोंधळ उडाला होता. ते पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधत होते. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे कोणत्याही सकल भागात पाणी साचले नव्हते.