ठाणे : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या ८१ पैकी ४१ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे ठाणे शहरात गेल्या महिनाभरापासून होऊ लागलेली करोना रुग्ण वाढ अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. शहरात आतापर्यंत करोनामुळे सहा मृत्यू झाले असून त्याचबरोबर एच ३ एन २ आजारामुळे आतापर्यंत दोनजणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. ठाणे जिल्ह्यात दररोज ८० च्या आसपास करोना रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५८१ सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यात दररोज आढळून येत असलेल्या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे ठाणे शहरातील असल्याचे दिसून येते. मंगळवारी जिल्ह्यात ८१ रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ४१ रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ठाणे शहरात सद्यस्थितीत ३५७ सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ठाणे शहरात करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरात आत्तापर्यंत सहाजणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – अंबरनाथचा कचरा बदलापूरला नकोच ! अंबरनाथच्या कचऱ्यावर सर्वपक्षीय एकवटले, प्रकल्पाला विरोध नाही

करोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका यंत्रणेकडून विविध उपाययोजना करण्याबरोबरच चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. असे असले तरी शहरात करोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन शहरातील करोना स्थितीचा आढावा घेतला. तसेच राज्य कोविड कृती दलाची निरीक्षणे, आरोग्य मंत्रालयाच्या सूचना, शहरातील खाजगी रुग्णालयातील कोविड उपचार, डॉक्टरांनी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे यावर आयुक्त बांगर यांनी सविस्तर चर्चा केली. चाचण्यांची संख्या वाढवणे, रुग्णसंख्येचा सतत आढावा घेणे, राज्य आणि देशातील इतर ठिकाणच्या रुग्णसंख्येवरही लक्ष ठेवावे, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. तसेच रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेशही त्यांनी दिले. करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याचे ‘डेथ ऑडिट’ करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या मृत्यूबाबत समोर आलेल्या निरीक्षणाचा आणखी अभ्यास करण्याच्या सूचना देत या निरीक्षणाचा करोनावरील उपचारात निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

करोनासाठी महापालिकेने नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकतेनुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, महापालिकेची आरोग्य केंद्रे येथे नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास तात्काळ पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी या मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. रुग्णसंख्या वाढत गेल्यास त्याच प्रमाणात खाटांची संख्याही वाढवली जाईल. खाटांची कमतरता भासणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेला सतर्क रहावे. कोणाचीही उपचाराअभावी गैरसोय होणार नाही. वॉर रूमच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे नियोजन केले जाईल. खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णामध्ये करोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास रुग्णांची चाचणी करून घ्यावी, तसेच, त्याबद्दल आरोग्य केंद्राच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्या रुग्णांचा मोबाईल नंबर पाठवून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात, कोणती कार्यवाही करायची याची मार्गदर्शक तत्वे खाजगी डॉक्टरांना दिली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र यांच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये असलेल्या खाजगी डॉक्टरांशी समन्वय साधला जात आहे. करोना संशयित, करोनाबाधित आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी, लिव्हर, मज्जातंतू यांचे विकार या सहव्याधी असलेले रुग्ण यांची माहिती देण्यासाठी या व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमधील बारावे येथील कचराभूमीला भीषण आग

आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांनीही आजार अंगावर काढू नये. चाचणी, विलगीकरण, उपचार या त्रिसूत्रीचे कायम पालन केले जावे. त्यामुळे आपल्याला करोनाचा प्रसार रोखता येईल. नागरिकांनी, कुटुंबात सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना करोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्यात हयगय केल्यास ते जिवावर बेतू शकते, याचे भान नागरिकांनी अवश्य बाळगावे, असे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.