पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : जिल्ह्य़ातील शहरांमध्ये मराठी नववर्षांनिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रा गेल्या वर्षी करोना संकटामुळे रद्द झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे यंदाही नववर्ष स्वागतयात्रा रद्द होण्याची चिन्हे असून यानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर करोनाचे सावट आहे. दरवर्षी स्वागतयात्रेची तयारी आयोजकांकडून चार ते पाच महिन्याआधीच सुरू होते. यंदा अजूनही यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आयोजकांनी सांगितले.

दरवर्षी मराठी नववर्षांनिमित्त जिल्ह्य़ातील विविध शहरात स्वागतयात्रा काढल्या जातात. त्यापैकी ठाणे आणि डोंबिवली शहरात मोठय़ा स्वागतयात्रा निघतात. वर्षांनुवर्ष या स्वागतयात्रांमधून लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत असे सर्व वयोगटातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होत असतात. या स्वागतयात्रांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्यात येतात. तसेच वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी आयोजक चार ते पाच महिन्याआधीपासून तयारीला लागलेले असतात. गेल्या वर्षी या स्वागतयात्रेची आयोजकांकडून मोठय़ा उत्साहात तयारी करण्यात आली होती. मात्र मार्च २०२० मध्ये जगभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे आयोजकांना स्वागतयात्रा रद्द करावी लागली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने यंदाही स्वागतयात्रेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यासंदर्भात आयोजकांशी संवाद साधला असता अद्याप स्वागतयात्रे संदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमांचे ऑनलाइन नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यातर्फे स्वागतयात्रा काढण्यात येत असते. दरवर्षी या संस्थेकडून  चार ते पाच महिना आधीपासून स्वागतयात्रेची तयारी सुरू होते. यंदा करोना संकटामुळे आयोजकांकडून स्वागतयात्रेसंदर्भात कोणतीही बैठक झालेली नाही. येत्या काही दिवसांत बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तर डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानकडूनही स्वागतयात्रेसंदर्भात अद्याप कोणतीही बैठक झाली नसून येत्या काही दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. तसेच संस्थेतर्फे ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे मराठी नववर्षांनिमित्त स्वागत यात्रेसह आयोजित करण्यात येणारे इतर कार्यक्रम यंदा ऑनलाइनच्या माध्यमातून करण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले.