ठाणे : ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, शहरात पक्ष प्रवेशांची मालिका सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका ज्योती मराठे यांना सोमवारी पक्षात प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाच्या नेत्याना धक्का दिला. या प्रवेशानंतर “लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतात. कारण, शिवसेना दिलेला शब्द पाळते.”, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांनी तसेत इच्छूकांनी निवडुण येऊ शकतो, असा प्रभाग निवडण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर या प्रभागांमध्ये कोणत्या पक्षातून उभे राहिल्यास निवडूण येऊ शकतो, याचीही चाचपणी केली जात आहे. यातूनच शहरात पक्ष प्रवेशांची मालिका सुरू झाली आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका ज्योती मराठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्याना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

विकासाचा धागा पकडून प्रवेश

कल्याण-डोंबिवली आणि ठाणे या दोन्ही महापालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामे झाली आहेत. तसेच माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकर्दीमध्ये देखील संपूर्ण मुंबई एमएमआरसह महाराष्ट्रामध्ये आम्ही टीम म्हणून काम केले, त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली. हे सर्व राज्याने पाहिले आणि तोच विकासाचा धागा पकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका ज्योती मराठे आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका आणि कल्याण ग्रामीणमध्ये बाबाजी पाटील यांनी समाजसेवक म्हणून विकासाचे काम केले. ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी मिळेल, त्या संधीचे सोने केले आणि समाजामध्ये एक वेगळी छाप पाडली. त्यांचा ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी चांगले काम केले आहे, असे शिंदे म्हणाले.

मुंबई एमएमआरचा विकास हेच धोरण

बाबाजी पाटील हे कुठल्याही पक्षात जरी होते, तरी सुद्धा त्यांचे आणि आमचे जिवाळ्याचे नाते होते, हे सर्वश्रृत आहे. बाबाजी पाटील, राजन मराठे यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकडचे पदाधिकारी यांच्यात आपुलकीच नाते आहे. जरी पक्ष वेगळे असले तरी जिव्हाळ्याच जे काही नाती असतात आणि आम्ही कधीही विकासामध्ये राजकारण केले नाही. मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलही राजकारण आडवे आणले नाही आणि येणारही नाही. शेवटी महाराष्ट्राचा विकास हा आमचा अजेंडा आहे. ठाणे जिल्ह्याचा विकास, मुंबई एमएमआरचा विकास हे सगळे धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेल आहे, असे शिंदे म्हणाले.

शिवसेना दिलेला शब्द पाळते

गेल्या दहा ते ११ वर्षांमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विविध विकासकामे केली. त्याचा फायदा लोकांना झाला आहे. अनेक रस्ते झाले आहेत, अनेक विकासाची काम झालेली आहेत आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना हवासा वाटतो. लोकांना मूलभूत सोईसुविधा पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व जे काही विकासाची काम केली, त्यामुळेच विधानसभेत यश मिळाले. राजेश मोरे हे आमदार झाले. ही पोचपावती आहे. आमचा विकासाचा अजेंडा आहे. एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आहे. म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळाले. तसेच यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल. कोण पडले कोण आले, यापेक्षा विकास हा महत्त्वाचा आहे आणि म्हणून शिवसेना आणि महायुती विकासाच काम करत आहे. पक्षात अशाप्रकारे आजच प्रवेश होत नसून यापुर्वी देखील असे पक्षप्रवेश झाले आहेत. लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतात. कारण, शिवसेना दिलेला शब्द पाळते. शेवटी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम नेत्याच असते आणि ते करण्याच काम आम्ही करतो आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिले, त्या लोकांना मूलभूत सोई सुविधा देणं हे आपले कर्तव्य आहे, असे शिंदे म्हणाले.