ठाणे – ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४४० करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली नाही. जिल्ह्यात बुधवारी आढळून आलेल्या ४४० करोना रुग्णांपैकी नवी मुंबई १८६, ठाणे १४०, मिरा – भाईंदर ५४, कल्याण -डोंबिवली ३०, ठाणे ग्रामीण २०,  बदलापूर पाच, भिवंडी तीन आणि उल्हासनगर पालिका क्षेत्रात दोन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मागील तीन दिवसांपासून प्रतिदिन शंभर रुग्णांनी वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. प्रतिदिन वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून आरोग्य विभागाने जिल्ह्यात प्राणवायू साठ्याचे आणि अतिरिक्त रुग्ण खाटांचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे

जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मागील पंधरा दिवसांपासून लक्षणीय वाढ होत आहे. प्रतिदिन वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांच्या देखील चिंतेत भर पडली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या या पार्श्ववभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे संभाव्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पालिका क्षेत्रांमध्ये तसेच ग्रामीण क्षेत्रामध्ये नव्याने १० हजार लिटर क्षमतेच्या प्राणवायूचा साठा करणाऱ्या १४ टाक्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील करोना रुग्णालयांना सज्ज राहण्याबरोबरच तेथिल रुग्ण खाटांची संख्या वाढविण्याचे काम जिल्हा आरोग्य विभागाकडून सुरु करण्यात आले आहे.  जिल्ह्यात प्रतिदिन २५० ते ४०० रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी अधिकतर रुग्णसंख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रातील आहे. तसेच जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही १ हजार ४०२ इतकी आहे.