डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके पथावर बहुतांशी दुकानदार दुकानासमोर लोखंडी जाळ्या टाकून रस्ता अडविण्याचे आणि दुकानासमोर आपली दुचाकी वाहने उभी करून जागा अडवत होते. या आडोशाने अनेक फेरीवाले आपले ठेले उभे करत होते.
पालिका फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी बुधवारी अचानक फडके रस्त्यावर कारवाई करून लोखंडी जाळ्यांनी रस्ते अडविणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्या दुकानासमोरील लोखंडी जाळ्या जप्त केल्या.
या लोखंडी जाळ्यांच्या आडोशाने फेरीवाल्यांनी उभारलेले ठेले, मंच घणाच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आले. या कारवाईने पदपथ रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बापूसाहेब फडके हा डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.
मागील काही दिवसांपासून फडके रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर नागरिकांनी वाहने उभी करू नयेत. ग्राहकांना आपल्या दुकानात निर्विघ्न येता यावे म्हणून तीन ते चार फुटाच्या लोखंडी पायदान जाळ्या तयार करून त्या पदपथ आणि रस्त्यावर आपल्या दुकानासमोर लावल्या होत्या. प्रत्येक दुकानदाराने अशाप्रकारे दुकानासमोर लोखंडी जाळ्या लावल्याने फडके रस्ता आक्रसला होता.
दुचाकी, रिक्षा, बस वाहनांना या लोखंडी जाळ्यांचा अडथळा येऊ लागला होता. जाळ्यांच्या बाजुला फेरीवाले आपले ठेले, मंच उभे करून सामान विकत होते.फडके रस्ता दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडीत अडकत होता. असाच प्रकार नेहरू रस्ता, मानपाडा रस्ता, डोंबिवली पश्चिमेत महात्मा गांधी रस्ता, फुले, गुप्ते, सुभाष रस्ता भागात सुरू होते. बाजीप्रूभ चौक, फडके रस्त्यावर व्यापाऱ्यांनी रस्ते अडविल्याची माहिती मिळाल्यावर फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाला हटाव पथक घेऊन लोखंडी जाळ्या रस्ते, पदपथावर ठेऊन रस्ते अडविणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. २५ हून अधिक जाळ्या जप्त करण्यात आल्या. अचानकच्या या कारवाईने दुकानदारांची तारांंबळ उडाली. फेरीवाल्यांचे ठेले घणाने तोडून सामान जप्त करण्यात आले.
डोंबिवली पश्चिमेत मात्र फेरीवाला हटाव पथकाने अशाप्रकारे कारवाई केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेत शहराच्या अंतर्गत भागात फेरीवाले, हातगाडी, टपरी चालकांचा सुळसुळाट झाला आहे.
ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकात विजय भोईर हे कामगार वीस वर्षापासून ह प्रभागात फेरीवाला हटाव पथकात कार्यरत आहेत. ह प्रभागात विजय भोईर यांची वतनदारी निर्माण झाल्याने आपणास कोणी काही करणार नाही या विचारातून ते ह प्रभाग हद्दीतील चौक, वर्दळीच्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाईच करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ह प्रभागातील फेरीवाले, टपरी चालकांंवर कारवाई होण्यासाठी आयुक्तांनी भोईर यांची तातडीने बदली करावी. त्यांच्या जागी नवीन फेरीवाला पथक प्रमुख नेमण्याची मागणी नागरिक करत आहेत.
रस्ता, पदपथ अडवून व्यवसाय करणे, जागा अडविणे असे प्रकार पुन्हा कोणी केले तर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील अशी तंबी व्यापाऱ्यांना दिली आहे. – हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त. फ प्रभाग.