कल्याण – डोंबिवलीपासून आठ किलोमीटर अंतरावर काटई-बदलापूर रस्ता भागात खोणी गाव हद्दीत म्हाडाच्या निर्माणाधीन असलेल्या एका इमारतीच्या एकविसाव्या माळ्यावरून पडून एका क्रेन चालकाचा सोमवारी जागीच मृत्यू झाला आहे. उंचावर काम करत असलेल्या क्रेन चालकाच्या क्रेनच्या कक्षात विद्युत वाहिनीचे शाॅर्ट सर्किट झाले. यावेळी मोठा आवाज झाल्याने घाबरून क्रेन चालक जमिनीवर कोसळला.
राकेश गंभीर गुप्ता (३०) असे मृत क्रेन चालकाचे नाव आहे. गणेश राजेंद्र कवटेकर या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कारागिराने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांना अकस्मित मृत्युची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे.
मृत राकेश गुप्ता हा मुळचा उत्तरप्रदेशातील खुशीनगर जिल्ह्यातील दुदही बासगाव सिकाटिया येथील रहिवासी होता. तो खोणी येथे बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांच्या राहुट्यांमध्ये राहत होता. पोलीस ठाण्यातील नोंदीत तक्रारदार गणेश कवटेकर यांनी म्हटल्यानुसार, एका प्रसिध्द बांधकाम कंपनीकडून काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव हद्दीत म्हाडाची इमारत उभारणीचे काम सुरू आहे.
एका इमारतीच्या २१ व्या माळ्यावर क्रेन चालक राकेश गुप्ता निर्माणाधीन इमारतीच्या जोडकामाचे काम क्रेनच्या साहाय्याने करत होता. क्रेन नियंत्रणाचे काम करत असताना क्रेनच्या चालक कक्षातील विद्युत वाहिनीमध्ये शाॅर्ट सर्किट झाले. या शाॅर्ट सर्किटचा मोठा आवाज क्रेनच्या कक्षात झाला. या मोठ्या आवाजामुळे घाबरून क्रेन चालक राकेश गुप्ता २१ व्या माळ्यावरून जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याच्या सर्वांगाला दुखापती झाल्या होत्या. याप्रकरणी अकस्मिक मृत्युची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश भाबड करत आहेत.