कल्याण- कल्याणमध्ये एका मयत तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी कल्याण पूर्व भागातील काही सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चातील फलकावर मयत तरूणीचे नाव संयोजकांनी उघड केले होते. यामुळे तपास काम, साक्षीपुराव्यांच्यामध्ये अडथळे येणार असल्याने पोलिसांनी मयत तरूणीचे नाव उघड केल्याने मोर्चाच्या संयोजकांवर गुन्हा दाखल केला.

कल्याण पूर्व भागात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर सात जणांकडून मागील दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले. वारंवार होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून या तरुणीने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी सात तरुणांसह तिच्या एका मैत्रिणीला अटक केली आहे. ते पोलीस कोठडीत आहेत.

आत्महत्या केलेल्या केलेल्या तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी कल्याण पूर्व भागात चक्कीनाका ते कोळसेवाडी पोलिस ठाण्यापर्यंत रहिवाशांनी मोर्चा काढला. या मोर्चात गावदेवी प्रतिष्ठान, व्ही. जे. फॅमिली, गावदेवी महिला बचत गट, तिसाई चालक-मालक संघटना, बाबा बोडके विद्यालय, सिद्धार्थ विद्यामंदिर, सम्यक विद्यालय, न्यू सहकार मित्र मंडळ, अनंतशेठ गवळी रिक्षा स्टँड अशा संस्था, संघटनांचे फलक हाती घेऊन रहिवासी पोलीसठाण्या समोर जमले होते. मोर्चातील फलकावर मयत तरूणीचे नाव उघड केल्याप्रकरणी मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांनी ‘पोस्का’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.