ठाणे : भिवंडी येथील अट्टल गुन्हेगार मुजाहीद्दीन शेख याला ठाणे पोलिसांनी एक वर्षासाठी पुणे येथील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. मुजाहीद्दीन विरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळले, जबरी चोरी यासारख्या एकूण चार गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत.

मुजाहीद्दीन हा भिवंडी शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असून काही महिन्यांपूर्वीच त्याला खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली होती. तो कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदी होता. त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव भिवंडी शहर पोलिसांनी  मे महिन्यात तयार केला होता. त्यानुसार त्यास पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुजाहीद्दीन विरोधात खूनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, जबरी चोरी, दमदाटी, शिवीगाळ यांसारख्या प्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. दहशत निर्माण करणाऱ्या आणि अट्टल गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक धोरण ठाणे पोलिसांनी अवलंबिले आहे. त्यानुसार गेल्या सात महिन्यात एकूण १४ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.