चढ्या तिकीट दरामुळे इच्छा असुनही वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करू शकत नव्हते. मात्र गुरूवारपासून वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी होताच, उन्हाच्या झळा, चटके देणाऱ्या तापणाऱ्या लोकलकडे पाठ फिरवून गारेगार लोकलमधून प्रवास सुरू केला. अनेक प्रवासी प्रथमच तिकीट काढून वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत होते. नियमित लोकलपेक्षा थंडगार वातावरणातून प्रवास करताना वेगळाच आनंद मिळत असल्याने नवख्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तिकीट कमी केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित लोकलच्या सकाळ, संध्याकाळच्या फेऱ्या वाढवाव्या. तसेच लोकलमध्ये तिकीट तपासणीसांनी लक्ष घालावं जेणेकरून अन्य प्रवासी या लोकलमध्ये चढणार नाहीत. त्यामुळे वातानुकूलित लोकलचे तिकीट, पास काढून प्रवास करणाऱ्यांना समाधानाने प्रवास करता येईल, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात येत होत्या.

नियमित लोकलमधून प्रवास करणारे अनेक महिला, पुरूष प्रवासी आज गारेगार लोकलचा अनुभव घेण्यासाठी तिकीट काढून कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातून ठाणे, मुंबईच्या दिशेने गेले. वातानुकूलित लोकल सुरू झाल्यापासून पास काढून मुंबईच्या दिशेने आरामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आजच्या गर्दीने कोंडी झाली. अशा प्रवाशांना लोकलमध्ये चढताना धक्केबुक्के आणि नेहमीची बसण्याची आरामदायी जागा मिळविताना कसरत करावी लागली. महाविद्यालयीन विद्यार्थी, कल्याण, डोंबिवली परिसरातून मुंबईत किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आज गारेगार प्रवासाचा आनंद लुटत होते. दुसऱ्या श्रेणीचे डबे प्रवाशांनी भरून गेले होतेच, त्याच बरोबर प्रथम श्रेणीच्या महिला, पुरूष डब्यात प्रवाशांची खचाखच गर्दी होती. काही महिन्यांपासून कल्याणकडून सीएसएमटीच्या दिशेने रिकामी, तुरळक प्रवासी घेऊन धावणारी वातानुकूलित लोकल गुरूवारी प्रवाशांनी खचाखच भरून धावत असल्याचे पाहून फलाटांवरील प्रवासी आश्चर्य व्यक्त करत होते. तिकीट दर कमी केले तर काय होऊ शकते, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.

वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी करण्यात येत असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने गेल्या सप्ताहात करताच, अनेक प्रवाशांनी मुंबई दिशेचा प्रवास करताना, वातानुकूलित लोकलची तिकिटे खिडकीवरून खरेदी केली. जुन्या चढ्या दरानेच तिकीट मिळाल्याने प्रवाशांनी तिकीट कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. पण दर कमी केल्याची घोषणा झाली आहे, त्याची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला त्या दराचे तिकीट देऊ, अशी उत्तरे तिकीट खिडकीवरील कर्मचारी प्रवाशांना देत होते.

सकाळची लोकल तुडुंब

कल्याणहून सकाळी मुंबईच्या दिशेने सुटणारी डोंबिवलीत ८.५९ मिनिटांनी फलाट क्रमांक पाचवर येणारी अतिजलद लोकल आज कल्याणहून प्रवाशांनी भरून आली होती. डोंबिवलीत नियमित लोकल सारखीच गर्दी गारेगार लोकलमध्ये झाली. उन्हाची काहिली, गरम झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या बहुतांशी प्रवाशांनी वातानुकूलित लोकलच्या प्रवासाला पसंती दिल्याचे दिसले.

“वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी झाल्यामुळे मासिक पास काढून प्रवास करत आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सकाळी सात ते नऊ वेळेत टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण ते सीएसएमटी वातानुकूलित लोकलची संख्या वाढवावी.” सचिन दीक्षित या प्रवाशाने सांगितलं. “मी विद्यार्थी आहे. वातानुकूलित लोकलचे तिकीट अधिक असल्याने दररोज महाविद्यायात नियमितच्या लोकलने जात होतो. आता वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी झाल्याने या लोकलमधील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी प्रवास करत आहे. प्रवास सुखाचा होत असेल तर पास काढून या लोकलमधून प्रवास करीन.”, असं ओजस चांदेकर, या विद्यार्थ्याने सांगितलं.

“वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी झाल्याने गेल्या दोन महिन्यानंतर प्रथमच या लोकलमधील गर्दी वाढली आहे. दोन पैसे जास्त पण उन्हाच्या चटका, घामाच्या धारातून मुक्तता मिळण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्याला प्राधान्य देतील. त्यामुळे रेल्वेने आता सकाळच्या मुंबई दिशेकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी सीएसएमटीहून कल्याणकडे येणाऱ्या वातानुकूलित लोकल वाढविल्या पाहिजेत.”, अशी मागणी ऋषीकेश भवारी या प्रवाशाने केली.