ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे अमीष दाखवून भावा-बहिणीला सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. ठाण्यातील कापूरबावडी भागातील एका गृहसंकुलात ४६ वर्षीय फसवणूक झालेली महिला राहते. तर तिचा ५६ वर्षीय भाऊ ओमान देशातील एका कंपनीमध्ये कामाला आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी तिच्या भावाची ओळख एका व्यक्तीशी समाजमाध्यमाद्वारे झाली होती. त्या व्यक्तीने त्यांचा मोबाईल क्रमांक काही व्हाॅट्सॲप समूहामध्ये सामाविष्ट केला होता. काही दिवसांनी तक्रारदार यांना देखील मोबाईल क्रमांक त्या व्हाॅट्सॲप समूहामध्ये सामाविष्ट करण्यात आले. या समूहामध्ये शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन केले जात होते. तसेच गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळू शकतो अशी माहिती दिली जात होती.

महिलेला त्यांच्यावर विश्वास बसल्याने तिने तिच्या बँक खात्यातील रक्कम समूहातील एका व्यक्तीने दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाईनरित्या पाठविले. त्यानंतर भावाच्या बँक खात्यातूनही काही रक्कम पाठविण्यात आली. ही रक्कम २ कोटी ३५ लाख ७५ हजार इतकी होती. त्यांनी परतावा काढण्याचा प्रयत्न केला असता, गुंतवणूकीसाठी सुरु करण्यात आलेले ॲप अचानक बंद झाले. तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक देखील बंद होते. हा सर्व प्रकार फसवणूकीचा होता. ते कोणीही शेअर बाजारातील तज्ज्ञ नसून सायबर फसवणूक करणारे होते असे लक्षात आल्यानंतर महिलेने याबाबत चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.