ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सरकारकडून केली जात आहे. विमानतळाच्या नामकरणावरून वाद पेटला असतानाच, दिवंगत दि.बा. पाटील यांच्या कुटुंबियांना सरकारने विशेष निमंत्रित म्हणून सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. या सोहळ्यात कोण-कोण उपस्थित राहणार आहे. ते जाणून घेऊया..
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी हे हवाई दलाच्या विमानाने कार्यक्रमस्थळी येणार असून त्यांचे विमान दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणार आहे. विमानतळाचे उद्घाटन करून ते परिसराची पाहाणी करणार असून त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांना संबोधित करणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार असून सध्या दरवर्षी सुमारे २० दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. विमानतळाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील विकासाचे आणि पायाभूत सुविधांचे धोरणात्मक नियोजन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यास ठाणे, मुंबई, उपनगर, रायगड, पालघर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगरातील भूमिपूत्रांकडून केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी आंदोलानाची हाक देखील दिली होती. त्यापूर्वी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या नेतृत्त्वाखाली एका कार रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर ६ ऑक्टोबरला मोठे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला होता. परंतु विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ल्यानंतर भूमिपूत्रांनी आंदोलन स्थगित केले.
कार्यक्रमाला दिबांचे कुटुंब
– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आमदार, शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. काही व्हीआयपी प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये दि.बा.पाटील यांच्या कुटुंबियांचा देखील सामावेश आहे. दि.बा. पाटील यांच्या कुटुंबातील पाच जणांना विशेष निमंत्रिताच्या प्रवेशिका देण्यात आल्या असून त्यामध्ये दि.बा. पाटील यांच्या पत्नी, दोन मुले, भाऊ आणि सून यांचा सामावे असल्याचे कळते आहे.