Thane news – दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात यंदा १ हजार ३३२ इतक्या दहीहंडीचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये १ हजार ८६ खाजगी तर २४६ सार्वजनिक दहीहंडी असणार आहेत. एकट्या ठाणे शहरात ५४३ दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यापाठोपाठ कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरातील चौक तसेच मुख्य मार्गावर, गृहसंकुलाच्या आवारात दहीहंडीचे आयोजन केले जाणार आहे. त्यापैकी ३० दहीहंडी या मानाच्या असणार आहेत. तसेच जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिक अशा विविध जिल्ह्यांतून गोविंदा पथके ठाणे शहरातील दहीहंडीच्या ठिकाणी थर रचण्यासाठी येत असतात. यावर्षी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडी या शहरांमध्ये १ हजार ३३२ इतक्या दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ हजार ८६ खाजगी तर २४६ सार्वजनिक दहीहंडी असणार आहेत. ठाणे शहरात टेंभीनाका मित्र मंडळ यांच्यावतीने टेंभीनाका येथे तर, आनंद चारिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चिंतामणी चौक, मनसेच्यावतीने भगवती मैदान, संकल्प प्रतिष्ठान यांच्यावतीने रहेजा गार्डन, संस्कृती प्रतिष्ठान यांच्यावतीने वर्तकनगर येथे मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाणार आहे. गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून थरांचा विक्रम रचणाऱ्यांसाठी लाखोंच्या पारितोषिकांची घोषणा केली जात आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ठाणे शहरात सर्वाधिक हंड्यांचे आयोजन केले जाणार आहे. यानंतर कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी येथे दहीहंड्यांचे आयोजन असेल. गृहसंकुलातही संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीच्या आवारात दहीहंडीचे आयोजन केले आहे.
दहीहंडी आधी मोठ्या भक्तीभावात साजरा होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी देखील ठाणे जिल्हा सज्ज झाला आहे. जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षी १५७ मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे २३, भिवंडी २९, कल्याण ४३, उल्हासनगर २५, वागळे इस्टेट ३७ या ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाणे, कल्याण आणि भिवंडी शहरातून एकुण ४९ मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
– आकडेवारी
परिमंडळ – सार्वजनिक – खाजगी मानाच्या
ठाणे – ५५ – २७४ – ०४
भिवंडी – ४५ – १९५ – ०६
कल्याण – ४७ – २७५ – ०८
उल्हासनगर – ५१ – १७६ – ०४
वागळे इस्टेट – ४८ – १६६ – ०८