डोंबिवली : डोंबिवली शहराच्या विविध भागात दररोज वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे रिक्षा तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. रिक्षा चालकांकडे गणवेश, वाहनाची कागदपत्रे नसतील तर त्याला घटनास्थळीच ई चलान पध्दतीने दंड ठोठावण्यात येत आहे. मागील तीन दिवसाच्या कालावधीत सुमारे तीन लाखाचा दंड चालकांकडून वसूल करण्यात आला.

ही तपासणी मोहीम अचानक सुरू करण्यात येते. त्यामुळे कागदपत्र जवळ नसलेले, गणवेशात नसलेले, भंगार रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी वापरणारे रिक्षा चालक कारवाई पथकाच्या तावडीत सापडत आहेत. अशा रिक्षा चालकांना ई चलान पध्दतीने त्याने केलेल्या गुन्ह्याप्रमाणे दंड ठोठावला जात आहे, असे डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण : शिळफाटा रस्त्यावर गोळवलीजवळ लोखंडी सळ्यांचा वाहनांना धोका

रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे, मोटार वाहन कायद्याचे पालन करुन प्रवासी वाहतूक करावी. कोणत्या अनावश्यक गोष्टी टाळाव्यात या जनजागृतीचा भाग म्हणून दोन दिवसापूर्वी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या हस्ते रिक्षा, इतर वाहन चालकांना माहिती पत्रके देण्यात आली आहेत. तरीही वाहन चालक वाहने चालविताना नियमभंग करत असल्याने वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. साहाय्यक आयुक्त धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी १८१ वाहन चालकांवर ई चलानव्दारे कारवाई करुन एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याणमधील खड्ड्यांनी प्रवासी हैराण

सोमवारी सकाळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, डोंबिवली वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे डोंबिवलीत वाहन तपासणी मोहीम राबविली. इंदिरा गांधी चौक, विष्णुनगर मासळी बाजार चौक, दिनदयाळ चौक, वर्दळीच्या रस्त्यावर अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येऊन ८६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या चालकांकडून दोन लाख ५६ हजार रुपयांचा दंड ई चलानव्दारे वसूल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिली. या कारवाईमुळे रेल्वे प्रवेशव्दार, वाहनतळ सोडून रिक्षा प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक गायब होत आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Political Live Update :”जगातल्या सर्वात मोठ्या पक्षावर फोडाफोडीची वेळ का?” उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवा. दंड रकमा वाढल्या आहेत याची जाणीव करुन देऊनही वाहन चालक चालक बेशिस्तीने वाहने चालवितात. यामुळे अपघाताची भीती असते. हे टाळण्यासाठी बेशिस्त वाहन चालकांवर आक्रमकपणे कारवाई मोहीम सुरू केली आहे. ” – उमेश गित्ते पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग, डोंबिवली.