लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलाची कामे गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. या कामांमुळे पर्यायी, एकेरी रस्त्यांवरुन महामार्गावर वाहतूक होते. त्यामुळे वासिंद आणि आसनगाव रेल्वे स्थानक परिसरात दररोज वाहन कोंडी होते.

या कोंडीचा सर्वाधिक फटका मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून कसारा, नाशिक, शहापूर भागात नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या, येणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक यांना बसत आहे. नाशिक परिसरातून दररोज भाजीपाला, दूध, मालेगाव येथून पोल्ट्रीसाठी कोंबड्या घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना या कोंडीचा फटका बसत आहे. उन्हाळ्यात अनेक वाहन चालक आजुबाजुच्या माळरान, शेतांमधून मार्ग काढत पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जात होते. पाऊस सुरू झाल्यापासून माळरान, शेतांमध्ये चिखल झाल्याने पर्यायी मधले मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना महामार्गावरील प्रस्तावित मार्गाने जावे लागते.

हेही वाचा… मुंबई लोकल ट्रेन सेवा ठप्प; बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रुळांचे जलमय Video पाहा

वासिंद येथे चक्रधारी हाॅटेल जवळ भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी पर्यायी मार्गाने वाहन चालकांना आसनगावकडे जावे लागते. आसनगाव येथे उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. वाहनांना पुलाच्या बाजुने काढलेल्या पर्यायी मार्गाने शहापूर, नाशिककडे जावे लागते. या पर्यायी, एकेरी मार्गावरुन मोटार, दुचाकी, अवजड वाहने एकाचवेळी येजा करतात. काही वाहन चालक घाईघाईने वाहन मध्येच घुसवतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.

हेही वाचा… बदलापुरहून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प; कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहापूर वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात असतात. परंतु, पर्यायी रस्त्यांवरुन संथगतीने वाहने धावत असल्याने वासिंद ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मागील काही महिन्यापूर्वी हे प्रमाण कमी होते. आता महामार्गावरील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहने संथगतीने धावतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. वासिंद, पडघा भागातून शहापूर येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या शाळकरी मुलांचे या कोंडीमुळे सर्वाधिक हाल होत आहेत. ही दोन्ही कामे वेगाने पूर्ण होतील यादृष्टीने शासनाने हालचाली करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.