नौपाडय़ातील धोकादायक इमारतींमध्ये मानवी वावर सुरूच
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे या इमारतींच्या वापरास प्रतिबंध करण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. नौपाडय़ातील धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याची घोषणा पालिकेने करून एक महिना उलटत आल्यानंतरही या इमारतींचा वापर सुरूच असल्याचे पाहणीत आढळून आले. काही इमारतींमध्ये जुगारी तसेच गर्दुल्ल्यांनी आपले अड्डे बनवले आहेत तर, काहींमध्ये कचरा फेकण्यात येत आहे. विष्णूनगरच्या नाक्यावरील एका धोकादायक इमारतीत तर चक्क सहकार खात्याचे विशेष लेखा परीक्षक कार्यालय चालवण्यात येत आहे.
विष्णूनगरच्या नाक्यावरील ठाकूर निवास या इमारतीत शासनाच्या सहकार खात्याचे विशेष लेखा परीक्षक कार्यालय अद्याप सुरू आहे. कधीही कोसळू शकणाऱ्या या इमारतीत अक्षरश: जीव मुठीत धरून येथील कर्मचारी आणि कामानिमित्त येथील नागरिक वावरत आहेत.
नाक्यावरील ही इमारत कोसळली तर फार मोठी जीवितहानी होण्याचा धोका परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. याच परिसरातील सहयोग पथ मार्गावरील श्रमधाम या रिकाम्या करण्यात आलेल्या धोकादायक इमारतीच्या आवाराची सध्या अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. तीन वर्षांपूर्वी ही इमारत रिकामी करण्यात आली. तेव्हापासून इथे कुणीही येऊन कचरा टाकून जातात. दुपारच्या वेळी गर्दुले, जुगारी लोक येथे आसरा घेतात.
वारंवार विनंती, अर्ज करूनही जुन्या ठाण्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला पूरक ठरेल, असे धोरण शासनाने जाहीर केलेले नाही.
त्यामुळे दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर मुंब्रा, वागळे तसेच किसननगर परिसरापेक्षा नौपाडय़ातील धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी बी-केबिन परिसरातील कृष्णा निवास इमारत कोसळल्यानंतर अतिधोकादायक ठरलेल्या इमारती महापालिका प्रशासनाने तातडीने खाली केल्या. येथे राहणारी हजारो कुटुंबे देशोधडीला लागली. मात्र इमारती तशाच राहिल्या. त्यामुळे भिकारी, गर्दुले आणि जुगाऱ्यांना आयते अड्डे मिळाले. गोखले रोडवरील धोकादायक इमारतीतील भाडेकरूंनी घरे खाली केली, परंतु तळमजल्यावरील व्यापाऱ्यांनी आपली ‘दुकाने’ सुरूच ठेवली आहेत.
नौपाडय़ातील बहुतेक धोकादायक इमारती आम्ही रिक्त केल्या आहेत. काही राहून गेल्या असतील तर त्या तातडीने खाली केल्या जातील. इमारतीच्या आवारात कचरा टाकला जात असेल तर तो तातडीने उचलला जाईल.
– अशोक बुरपल्ले, उपायुक्त, महापालिका