महापालिका हद्दीत सध्या १,३२४ करोनाबाधित; मुखपट्टी न घालणाऱ्या ५० ते ६० पादचाऱ्यांवर दररोज कारवाई
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. सध्या शहरात १,३२४ उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मुखपट्टी न घालता फिरणाऱ्या किमान ५० ते ६० पादचाऱ्यांवर दररोज कारवाई केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असली तरी गाफील राहू नका, अशा सूचना सरकार आणि महापालिकेमार्फत दिल्या जात आहेत. मुखपट्टी न घालणाऱ्या व्यापारी, फेरीवाले, पादचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या सगळ्यांचे दृश्य परिणाम म्हणजे दोन्ही शहरांतील करोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे, असा दावा महापालिकेमार्फत केला जात आहे. दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार म्हणून रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. महापालिकेकडून मुखपट्टी न घालणाऱ्या पादचारी, वाहन चालकांवर मागील आठ महिन्यांपासून कारवाई केली जात आहे. या कालावधीत मुखपट्टी न घालणाऱ्या सुमारे २५ ते ३० हजार पादचारी, व्यापारी, वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून प्रशासनाने १० प्रभागांच्या हद्दीतून सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा दंडात्मक निधी जमा केला आहे.
पालिका हद्दीत दररोज सुमारे १५०० हून अधिक करोना चाचण्या केल्या जातात. खासगी डॉक्टरांना एखाद्या रुग्णाविषयी संशय असेल तर त्या रुग्णाला तात्काळ पालिकेच्या प्रतिजन चाचणी केंद्रावर करोना चाचणीसाठी पाठविले जाते. महापालिका हद्दीत सध्या विविध करोना काळजी केंद्रांत एक हजार ३२४ करोना रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीनंतर १२५ ते २०० रुग्ण सापडत होते. हे प्रमाण आता शंभरीच्या आसपास आले आहे. करोना रुग्णसंख्या घटत असली तरी गाफील राहून काम करू नका, असे आदेश आयुक्तांनी वैद्यकीय विभाग आणि प्रभाग कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्कतेने काम करत आहे. मागील नऊ महिन्यांच्या काळात एकूण ५३ हजार ४३२ रुग्ण उपचार घेऊन घरी सुखरूप गेले आहेत. सध्या कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिम, टिटवाळा, मोहना भागात करोनाबाधितांची संख्या अत्यल्प आहे. या भागात सुमारे १० ते १५ रुग्ण आढळून येतात. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व भागातील रोजची रुग्णसंख्या सुमारे २० ते ३५ आहे. या भागात मोठे गृह प्रकल्प आहेत. नोकरदारवर्ग अधिक आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.
कल्याण-डोंबिवलीतील रुग्ण
५५,८३८ एकूण बाधित
५३,४३२ करोनामुक्त
१,०८२ मृत्यू
१,३२४ उपचाराधीन