डोंबिवली – आगामी महापालिका निवडणुकीतील चार सदस्य प्रभाग पद्धतीत निवडून आले पाहिजे, असा भविष्यलक्ष्यी विचार करून कल्याण, डोंबिवली शहरातील शिंदे शिवसेनेतील कार्यकर्ते, काँग्रेसचे माजी नगरसेवक, ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली जीमखाना येथे आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरला तो उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांचा भाजप प्रवेश.
मागील तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणून चर्चा सुरू होती. म्हात्रे यांच्या प्रवेशाने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. दीपेश यांच्या सोबत त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नाबाई म्हात्रे, बंधू माजी नगरसेवक जयेश आणि त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार कपील पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार या प्रवेशासाठी महत्वाचा ठरला. आई, वडिलांचे आशीर्वाद घेऊन मोठागाव येथील बंगला येथून दीपेश म्हात्रे आणि त्यांचे समर्थक मिरवणुकीने वाजतगाजत मिरवणुकीने पोहचले.
मागील ४० वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले माजी प्रदेश काँग्रेस सचिव आणि माजी नगरसेवक संतोष केणे यांनी राहुल आणि प्रणव ही दोन मुले, तसेच आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे शिवसेनेचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मनोज वैद्य, राजू सावंत, संदीप सामंत आणि अरविंद मानकर या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कल्याण पूर्वेतील उद्योजक संजय गायकवाड, कल्याण ज्वेलर्स असोसिएशनचे राकेश मुथा अशा विविध पक्षातील, सामाजिक संघटना, संस्था, व्यावसायिकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
आगामी महापालिका निवडणुकांची व्यूहरचना आणि त्यामधील आपले स्थान याचा विचार करून या मंडळींनी हे प्रवेश केले. भाजप प्रवेशासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली जीमखाना मैदान फुलून गेले होते. आणखी काही प्रवेश लवकरच भाजपमध्ये होतील, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. या कार्यक्रमाला आमदार सुलभा गायकवाड, माजी खासदार कपील पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रदेश नेते शशिकांत कांबळे उपस्थित होते.
कल्याण, डोंबिवली पालिकेवर पारदर्शकपणे, विकासाची दृष्टी समोर ठेऊन काम करेल असा महापौर देण्याचा निर्णय महायुतीत झाला आहे. महापौर कोणाचा असेल याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. तो उलगडा नंतर होईल. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापौर देण्याचे नक्की असून तो भाजपचा असेल याची खात्री देतो. – रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष.
राष्ट्रीय हिताच्या मुल्यांचे रक्षण आणि हिंदुत्वाची कास असणाऱ्या भाजपमध्ये आपण सामान्य जनतेची कामे अधिक प्रभावीपणे करता यावीत, त्यांंना नागरी समस्यांमध्ये न्याय मिळवून देता यावा यासाठी प्रवेश केला. ही कामे करताना भाजपमधून नक्कीच ताकद मिळेल असा विश्वास आहे. – दीपेश म्हात्रे, भाजप कार्यकर्ता.
