आठ महिन्यांत ८८ जणांना लागण
गेल्या आठ महिन्यांत ठाणे जिल्ह्य़ात ८८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ५१ रुग्ण फक्त ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत. अद्याप सप्टेंबर महिन्याची आकडेवारी मिळाली नसल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा वैद्यकीय कार्यालयात करण्यात आली आहे. मात्र मृत्यू पावलेल्यांची संख्या त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण विभागात एकूण तीन तर शहरी विभागात ३९ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान डेंग्यूचे ग्रामीण भागात एकूण २४ तर शहरी भागात ६४ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी महिन्यात कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील एकाला डेंग्यूमुळे आपले प्राण गमवावे लागले. सप्टेंबर महिन्याची आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी याच महिन्यात कल्याण-डोंबिवली पालिकेत काम करणाऱ्या आणि अंबरनाथ येथे राहणाऱ्या एका अधिकारी महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू ओढावला आहे. पाऊस थांबल्याने ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाली आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार बळावले आहेत. त्यातच टायफॉइड, मलेरिया यांसारख्या आजारांनीही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवू नये यामुळे डेंग्यू रोगाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होते, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यतील डेंग्यूचे रुग्ण
(जानेवारी ते ऑगस्ट २०१७)
१४ ठाणे
१७ कल्याण-डोंबिवली
५ नवी मुंबई</p>
२४ भिवंडी
३ अंबरनाथ
३ बदलापूर
२४ ग्रामीण भाग