BJP News, Shivsena News : ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदे यांचे कुटूंबिय उपस्थित होते. राज्यातील महायुती सरकारमधील मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात असून त्याचबरोबर या भेटी मागचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. असे असले तरी या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या शिवशंकर प्रतिमेची चर्चा सर्वत्र होत असून हि प्रतिमा देण्यामागचे कारण शिंदे यांनी आता स्पष्ट केले आहे.

राज्यातील महायुती सरकारमधील मित्रपक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्ली गाठली. याठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या संसदेतील दालनामध्ये शिंदे यांनी पक्षाच्या खासदारांसह भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी स्वतंत्रपणे शहांशी चर्चा केली. त्यांच्या भेटीनंतर पंतप्रधानांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी जाऊॐ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही भेटींतील राजकीय चर्चेबाबत शिंदेंनी मौन बाळगले. राज्यातील महायुती सरकारमधील मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात असून त्याचबरोबर या भेटी मागचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.

शिंदे काय म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच शिवसेना – भाजप युती ही एनडीए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असेही पंतप्रधानाना भेटीदरम्यान सांगितल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवशंकर प्रतिमेची चर्चा

बुधवारी दिल्ली दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच त्यांना शिवशंकराची प्रतिमा भेट दिली. या प्रतिमेची सर्वत्र चर्चा होत आहे.

प्रतिमा देण्यामागचे हे कारण

उपमुख्यमंत्री शिंदे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी मोदींना शिवशंकराची प्रतिमा भेट दिली. त्याचे कारण शिंदे यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या संदेशामध्ये दिले आहे. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलांनी आधी ‘ऑपरेशन सिन्दुर’ आणि आता ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांना शिवशंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.