कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांमधील वाढती गुन्हेगारी, गर्दुल्ल्यांचा वाढता उपद्रव पाहून आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनीच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री कल्याण शहराच्या विविध भागात उघड्यावर गांजा, मद्य, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दहा तळीरामांना पोलिसांनी पकडले. या तळीरामांना उपायुक्त झेंडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत तळीरामांना पोलीस खाक्या दाखवत खरडपट्टी काढली.

पुन्हा अंमली पदार्थ, गांजा, तंबाखुजन्य पदार्थ सेवन करणार नाही, अशी तंबी देत पकडून आणलेल्या तळीरामांना उपायुक्त झेंडे यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी उठाबशा काढायला लावल्या. २५ ते ३० वयोगटातील हे तरूण होते. कल्याण शहराच्या विविध भागात ते अंमली पदार्थ सेवन करताना पोलिसांनी पकडले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात तळीरामांची उपायुक्तांनी हजेरी घेतली.

हेही वाचा >>>प्रकृती खराब असल्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला पोलीस आणि अग्निशमन दलाने वाचविले

कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले, तळीराम पादचाऱ्यांंवर हल्ला करून त्यांना लुटण्याचे प्रकार करत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांच्या खाडी किनारी भागात, मोकळ्या जागांमध्ये रात्री नऊ वाजल्यानंतर तरूणांचे जथ्थे अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी बसतात. उघड्यावर हे प्रकार सुरू असतात. तरूणांची एक पीढी या प्रकाराने बरबाद होत असताना स्थानिक पोलीस करतात काय, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. काही भागात गावठी दारूचे अड्डे सुरू आहेत. परिसरातील नागरिकांना या अड्ड्यांचा, मद्यपींचा त्रास होतो. याविषयी तक्रारी करूनही स्थानिक पोलीस काही कारवाई करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>>कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

या पार्श्वभूमीवर आता उपायुक्त झेंडे हेच कल्याण, डोंबिवली परिसरातील गैरधंदे बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन महिन्यांपासून उपायुक्त झेंडे यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांनी रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांंवर पोलीस फौजदारी कारवाई करत आहेत. मागील चार वर्षाच्या काळात कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून कधीही अशाप्रकारची आक्रमक कारवाई कल्याण, डोंबिवली शहर हद्दीत करण्यात आली नव्हती. उपायुक्त झेंडे यांंनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील गैरधंदे मोडून काढण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक पोलीस ठाणी आता कामाला लागली आहेत.

उपायुक्त अतुल झेंडे यांनी अचानक डोंबिवली मोठागाव खाडी किनारा, देवीचापाडा जेट्टी, नवापाडा, गणेशनगर चौपाटी, कोपर गाव खाडी, माणकोली उड्डाण पूल भागात अचानक रात्री नऊ वाजल्यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती न देता दौरा करून या भागात सरू असलेल्या गैरधंदे, गैरप्रकारांची पाहणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.