निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत विकासकामांना सुरुवात

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरातील नव्या रस्त्यांच्या कामांना बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीपैकी १५ कोटी रुपयांची रस्तेकामे करण्यात येणार आहेत. डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील रस्ते पहिल्या टप्प्यात यासाठी निवडण्यात आले आहेत. या दोन्ही विभागांमध्ये भाजपचे प्राबल्य असल्याने शिवसेनेने रस्तेकामांच्या माध्यमातून या भागात भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. 

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याण-डोंबिवली पालिकेसाठी ३६१ कोटी रुपयांच्या खर्चाचे ३२ रस्ते मंजूर केले आहेत. यामधील पाच कोटी रुपयांपेक्षा कमी तरतुदीचे सात रस्ते महापालिका करणार आहे. उर्वरित रस्ते प्राधिकरण करणार आहे. या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार एजन्सी नियुक्ती केली आहे. या एजन्सीकडून रस्ते कामाचे विस्तृत आराखडे प्राप्त झाले की तात्काळ पालिका, प्राधिकरण निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

शिवसेनेचे ‘मिशन डोंबिवली’

शिवसेना-भाजपची युती असल्याच्या काळापासूनच डोंबिवलीत भाजपला मानणारा एक मोठा वर्ग आहे. पाच वर्षांपूवी झालेल्या महापालिका निवडणुकीत डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर भाजपचे नगरसेवक निवडून आले. डोंबिवलीच्या जोरावर भाजपने शिवसेनेपुढे आव्हान उभे केल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले. कल्याण पूर्व आणि पश्चिमेत शिवसेनेला मिळालेल्या जागांच्या जोरावर या पक्षाची सत्ता महापालिकेत आली. विधानसभा निवडणुकीत भाजपचे रवींद्र चव्हाण मोठ्या मताधिक्याने या भागातून निवडून आले आहेत. या वेळी भाजप आणि मनसेचे गणित जुळल्यास डोंबिवली आणि काही प्रमाणात ग्रामीण पट्ट्यातून शिवसेनेपुढे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीकडे लक्ष केंद्रित केले असून या भागात विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे.

क्रीडासंकुलात व्यायामशाळा

सावळाराम क्रीडासंकुलात येणाऱ्या रहिवाशांना मोकळ्या वातावरणात व्यायाम करता यावा यासाठी खासदार डॉ. शिंदे यांच्या विशेष निधीतून मोकळ्या वातावरणातील व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे, असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सांगितले.