– ३२ टन निर्माल्य जमा

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत गणपतीची सहा फुटा पेक्षा कमी उंची असलेल्या गणेशभक्तांनी गणपती विसर्जनासाठी पालिकेने विविध भागात तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांना सर्वाधिक प्राधान्य दिले. रविवारी रात्रीपर्यंत पाच दिवसांचे एकूण १८ हजार १७१ गणपतींचे विसर्जन झाले. यामध्ये सात हजार ४१९ मूर्ती शाडुच्या, दहा हजार ७५२ मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत्या.

गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत एकूण सुमारे तेरा ते चौदा हजार शाडुच्या मूर्तींचे भक्तांनी विसर्जन झाले. मागील अनेक वर्षानंंतर प्रथमच गणेश भक्तांनी शाडुच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यास प्राधान्य दिले. आयुक्त अभिनव गोयल यांचे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे संदेश. पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, शहरातील पर्यावरण दक्षता मंडळ आणि इतर सामाजिक संस्थांनी शाडुच्या गणपती तयार करण्यासाठी घेतलेल्या कार्यशाळा, केलेली जनजागृतीचा हा दृश्य परिणाम आहे.

पालिकेने सावळाराम महाराज क्रीडा संकुलात बंदिस्त क्रीडागृहात पाच हजार शालेय विद्यार्थ्यांकडून शाडुच्या गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेऊन विक्रम नोंदवला. या विद्यार्थ्यांनी चार हजार ४६७ शाडुच्या मूर्ती बनविल्या. आयुक्त अभिनव गोयल, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी आणि सहकाऱ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.

गणपती विसर्जना बरोबर सोबत आणलेले निर्माल्य तलावाजवळील, खाडी किनाऱ्या जवळील निर्माल्य कलशात पालिकेकडून जमा करून घेतले जात आहे. रविवारी पालिका हद्दीत ३२ टन निर्माल्य जमा करण्यात आले. हे निर्माल्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गणेश मंदिर डोंबिवली, पालिकेचे बायोगॅस खत प्रकल्प येथे खत तयार करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचे पालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. यामुळे खाडी भागातील जलप्रदूषण कमी होण्यास साहाय्य होणार आहे. या आयुक्त अभिनव गोयल यांच्या आवाहनाला गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

गणपती विसर्जन स्थळांची अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त समीर भूमकर यांनी समपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. आणि विसर्जन स्थळी गणेश भक्तांची विसर्जनाबाबत कोणतीही गैरसोय होणार नाही याच्या सूचना केल्या.

पालिकेने पालिका हद्दीतील नागरिकांना आपल्या घर परिसरातील विसर्जन स्थळे गुगल मॅपच्या माध्यमातून प्रसिध्द केली आहेत. त्यामुळे गणेश भक्त विसर्जन स्थळांजवळील कोंडीत अडकण्यापेक्षा घराजवळील स्वच्छ पाण्यात गणपती विसर्जनाला प्राधान्य देत आहेत.

गणेशोत्सवापूर्वी महिनाभराच्या कालावधीत पर्यावरणस्नेही गणपती उत्सव साजरा करणाऱ्यावर नागरिकांनी भर द्यावा. यासाठी पालिकेने शाडुच्या मातीपासून गणपती मूर्तीची कार्यशाळा, जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांचा प्राधान्याने वापर करावा यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याचे चांगले परिणाम गणपती विसर्जनाच्या माध्यमातून दिसत आहेत. रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग.