ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या नालेसफाई तसेच रस्त्यांच्या कामांची सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित झालेल्या या दौऱ्यात भाजपाला डावलल्याची बाब समोर आली असून, याच मुद्द्यावरून भाजपामधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यानिमित्ताने ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये विसंवाद असल्याचे चित्र समोर आले आहे.

ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे सुरू आहेत. तसेच यंदा ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी रस्ते नूतनीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे ची मुदत असून ही मुदत संपण्यासाठी आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिकेला निर्देशित केल्यानुसार रस्त्यांच्या कामांचे त्रयस्थ मूल्यमापन करण्यासाठी पहिल्यांदाच नमुनेही घेण्यात आले. या दौऱ्याला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेनेच्या ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 cm visit Thane
छायाचित्र – Sarang Medhekar/fb

हेही वाचा – ठाण्यात सुरक्षा साहित्यविनाच कामगार करत आहेत नालेसफाई

या दौऱ्याची माहिती भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नसल्याची बाब समोर आली असून यामुळेच दौऱ्यात भाजपाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. केवळ शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या दौऱ्याची माहिती दिली नसल्याबाबत भाजपामधून नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर यांनी याबाबत समाज माध्यमांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – ठाण्यातील ‘त्या’ अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिका आयुक्तांना आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मुख्यमंत्र्यांचा ठाण्यामध्ये विकास कामांचा पाहणी दौरा फक्त शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या सोबत संपन्न झाला. भाजपा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना दौऱ्याची माहिती न देता जाणीवपूर्वक डावलण्यात आले’, असे मेढेकर यांनी म्हटले आहे. युती धर्म फक्त भाजपा पदाधिकारी यांनी पाळायचा, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.